राजेशाही हिरवळ (बेंगलूरू-मैसूरू-ऊटी)...

दर वर्षी, दिवाळीत किंवा डिसेंबरमध्ये मी एक पारिवारिक सहल (फॅमिली ट्रिप) करतो. यंदा म्हणजे २०२३च्या दिवाळीत, बेंगलूरू-मैसूरू-ऊटी अशी सहल ठरवली...


वर्षभर आधीच या ट्रिपची तयारी सुरू होती. वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजंसीजकडून या ट्रिपची माहिती मिळवण्यात जून २०२३ उजाडला. चार-पाच ट्रॅव्हल कंपन्यांमधून आम्ही राजगुरू टूर्सची निवड केली. दादरला असलेल्या राजगुरू टूर्सने माझ्या गरजेनुसार ट्रिपची आखणी करून दिली. ऑफ सीझन म्हणजे जून-जुलाय-ऑगस्टमध्ये सर्व बुकिंग केल्याने सर्व गोष्टींचे दर कमी होते. हॉटेल
, विमानाची तिकिटं आणि तिथे फिरण्यासाठी गाडी या सर्वांसाठी ठरलेली रक्कम पूर्ण करून आम्ही ट्रिपच्या दिवसाची वाट पाहू लागलो...

१३.११.२०२३...

सोमवार दिनांक १३.११.२०२३ रोजी सकाळी ९:२५च्या एयर इंडियाच्या विमानाने आम्ही प्रथम मुंबई ते बेंगलूरू असा प्रवास केला. विमान प्रवासात विमानात मिळणाऱ्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांचं आगाऊ बुकिंग, त्या त्या कंपनीच्या साईटवर जाऊन, बुकिंग किंवा पी.एन.आर. नंबर देऊन करता येतं. इतकंच नाही, तर फ्लाईटमधला सीट नंबर आरक्षित (reserve) करून वेब चेक-ईन करून ई-बोर्डिंग पासही मिळवता येतो, जेणेकरून फ्लाईटच्या दिवशी जास्त वेळ मोडत नाही. तर साधारण एक तास पस्तीस मिनिटांचा प्रवास करून ११:०० वाजता आम्ही बेगलूरूला पोहोचलो...

सामान मिळून बाहेर येईपर्यंत जवळ-जवळ पाऊण तास गेला. एयरपोर्टच्या बाहेर आम्हाला न्यायला गाडी उभीच होती. आमचा पुढचा प्रवास सुरू झाला तो मैसूरूच्या दिशेने. त्या प्रवासात तीन गोष्टी पहायला मिळाल्या. पहिली होती पंचमुखी गणेश मंदिर. तिथले रहिवासी सांगतात, की पाच दिशांना पाच तोंडं असलेलं हे गणेश मंदिर सर्व क्लेश आणि मनस्ताप नाहीसं करतं. दुसरी गोष्टी होती पासपोर्ट अंजनेय मंदिर. नाव थोडं विचित्र आहे. असं म्हणतात, की परदेशवारी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचं पासपोर्ट इथे हनुमानाच्या चरणी ठेऊन आशीर्वाद घेतला तर परदेशगमनाची इच्छा पूर्ण होते. तिसरी गोष्ट होती रामनगर शहर. हे तेच शहर आहे जिथे बहुचर्चित "शोले" या चित्रपटाचं चित्रिकरण झालं होतं. शहराच्या आत पूर्ण सेट आहे. पण तिथे जायला देत नाहीत. गब्बरच्या अड्ड्यातले ते डोंगर मात्र दिसतात...



पावणे दोनशे कि.मी. अंतर
, दुपारचं रणरणतं ऊन, बेंगलूरू-मैसूरू लांब सडक एक्सप्रेस वे, आम्ही ठरवलं आज कुठलीच साईट न बघता हॉटेलमध्ये आराम करायचा. तिथे पोहोचताच दोन गोष्टींच्या दर्शनाने सारा क्षीण निघून गेला. एक म्हणजे हॉटेलच्या परिसरात फिरणारं मांजर आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्विमिंग पूल. दोन्ही गोष्टींचा यथेच्छ आस्वाद घेण्यात दिवस कधी संपला ते कळलंच नाही...

१४.११.२०२३...

आजचा दिवस मैसूरूमधल्या साईट्स पाहण्यात घालवायचा असं आम्ही ठरवलं. त्यात मैसूरू झू पाहता येणार नाही याची खंत होती. दर मंगळवारी हे झू बंद असतं. आम्ही आमच्या पहिल्या ठिकाणाकडे, म्हणजे चामुंडेश्वरी मंदिराकडे निघालो. वाटेत झूचं गेट उघडं दिसलं. आमच्या ड्रायव्हरने कन्नड भाषेत तिथल्या माणसाला विचारलं तेव्हा समजलं, की बालदिनानिमित्त मुलांसाठी खास झू उघडी ठेवली होती. मुलांसाठी पूर्ण विनामूल्य आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या मोठ्यांना तिकिटं लावली होती. आम्ही दोन्हीही बाजूंनी मोकळी असलेली गाडी बुक केली. चालत झू पहायचं तर साधारण दोन ते अडीच तास लागतात. पण ही गाडी आपल्याला तासाभरात पूर्ण झू फिरवते. अर्थात मोक्याच्या जागी थांबवत आणि प्राणी, पक्षी दाखवत हा प्रवास पूर्ण होतो...






या झूमध्ये वाघ
, सिंह, हत्ती, चित्ते हे नेहमीचे प्राणी तर आहेतच. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे साप, मगरी, पोपट हे सुद्धा पहायला मिळतात. झेब्रे, कांगारू आणि जिराफही समाविष्ट केले गेले आहेत. एखाद्या पिंजऱ्याजवळ गाडी साधारण पाच ते सात मिनिटंच थांबते. फक्त वाघ आणि सिंहाच्या पिंजऱ्यासमोर जरा जास्त वेळ थांबावं लागतं. आमची राईड पूर्ण करून आम्ही गेटबाहेर पडलो तेव्हा साडे बाराचा सुमार होता. 'आधी पेटपूजा मग काम दूजा' हे मनात आणत आम्ही पोटभर जेऊन घेतलं. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी डोसे, इडली, उथप्पे हे प्रकार दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातही मिळतात. पण मैसूरूमध्ये हे प्रकीर फक्त नाश्त्यात देण्याची पद्धत आहे. बाकीच्या वेळी पंजाबी किंवा दाक्षिणात्य जेवणच मिळतं. पोटोबा झाला आणि आमची स्वारी चामुंडेश्वरी मंदिराकडे निघाली...




चामुंडेश्वरी मंदिर हे पर्वतावर स्थित खूप प्राचीन मंदिर आहे. तिथे जाण्यासाठी एक छोटा घाट पार करावा लागतो. घाट पार केल्यावर मेन गेटपासून मंदिर थोडं वर आहे. तिथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग पार्किंगच्या डाव्या बाजूने पायऱ्या चढून बाजारातून जाणारा मुख्य मार्ग आणि दुसरा मार्ग आहे पार्किंगच्या आधी
, महिषासूर राक्षसाच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूने वर जाणारा वाम मार्ग. वाम मार्ग अशासाठी, की खरतंर तो परतीचा रस्ता आहे. पण मंदिराजवळ लवकर पोहोचण्यासाठी काही लोक तो मार्ग वापरतात. देवळाजवळ चपला-बूट ठेवण्यासाठी एक सरकारी जागा आहे. तिथे पांढऱ्या पिशव्या टांगलेल्या असतात. तीन जोडांचे तीस रुपये तर चार जोडांचे पन्नास असे ठरलेले दर आहे. कलशाच्या बरोब्बर खाली दोन रांगा आहेत. एक तीस रुपये तिकिटाची जी वेटोळे घालत गाभाऱ्यापर्यंत जाते आणि दुसरी थेट मूर्तीपर्यंत जाणारी शंभर रुपये तिकिटाची स्पेशल लाईन. साध्या लाईनमधून साधारण दोन तास लागतात तर स्पेशल लाईन तासाभरात दर्शन घडवते...






सुट्टीचे दिवस असल्याने स्पेशल लाईनला सुद्धा प्रचंड गर्दी होती. आम्ही तिथल्या खांबांची
, कलशाची कोरीव कामं न्याहाळून, कौशल्याचं कौतुक करून, देवीला बाहेरूनच नमस्कार करून परत फिरलो. घाट उतरताना एका पॉईंटवरून खाली पाहिल्यावर संपूर्ण मैसूरू शहराचा सुंदर देखावा दिसला. ते दृष्य कॅमेऱ्यात साठवून आम्हू मैसूरू पॅलेसला येऊन पोहोचलो. मैसूरूमध्ये असलेल्या सात महालांपैकी एक आणि शहराच्या मधोमध असलेला मैसूरूमधला सर्वात मोठी महाल म्हणजे मैसूरू पॅलेस. जुना लाकडी महाल जळून गेल्यावर हा नवा दगड आणि लाकडाचा महाल बांधला गेला. महालाला दोन दरवाजे आहेत. एक महाराजा द्वार जे राजेशाही लोकांसाठी आहे, तर दुसरं सामान्य द्वार जे जनतेसाठी खुलं असतं. महालाचं सौंदर्य, भव्य परिसर, ते कलात्मक खांब, ते कोरीव काम, हे संगळं नजरे खालून घालताना एक नवलाजक गोष्ट समजली. संपूर्ण महालाला electric bulbsने सजवलं जातं. दर रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या संध्याकाळी सात ते रात्री अकरा, ते सर्व बल्ब पेटवून रोषणाई केली जाते...




आम्हालाही ती रोषणाई पाहण्याचा मोह झाला. दिवाळीच्या पाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने रोषणाई होणार होती. सात वाजायला अजून दोन तास होते. पॅलेसच्यी बाहेर घोडागाड्या उभ्या असतात. वेगवेगळ्या गाड्यांचे वेगवेगळे दर असतात. पाच मिनिटांची छोटी फेरी आणि वीस मिनिटांची मोठी फेरी असं ठरलेलं असतं. थोडा मोलभाव करावा लागतो. पण घोडागाडीचा छान अनुभव मिळतो. टांग्याची छोटी सफारी झाल्यावर मैसूरू पॅलेसजवळ असलेल्या कारंजी लेकला जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. निसर्गरम्य परिसर
, छोटसं सरोवर, वृक्षवल्लीफुलं आणि माकडं, यांमध्ये दीडेक तास गेला आणि अंधार होता होता आम्ही पुन्हा पॅलेसकडे निघालो. संपूर्ण महालाला आणि परिसराला केलेल्या नेत्रदिपक रोषणाईमुळे तिथला परिसर उजळून निघाला. ती सुंदर दृष्य साठवून आम्ही मैसूरू पॅलेसचा निरोप घेतला...

१५.११.२०२३...

सकाळचा काळ हा प्रवासाचा होता. आमचा पुढचा टप्पी होता ऊटी. फक्त १४० कि.मी.चं अंतर होतं. पण वाटेत सत्तरेक डोंगर आणि मुख्यत्वे दोन मोठी जंगलं होती. त्यामुळे प्रवास लांबणार होता. नाश्ता करून ९:३० वाजता आम्ही मैसूरू सोडलं. अर्ध्या-पाऊण तासाने आम्ही एका त्रिठ्ठ्यावर पोहोचलो. त्रिठ्ठा म्हणजे तीन रस्ते जिथे मिळतात ती जागा. आमच्या समोर होता तामिळनाडूकडे जाण्याचा रस्ता. आमच्या मागे कर्नाटक होतं, तर उजवीकडे साधारण वीस कि.मी.वर केरळ होतं. तीन राज्यांना जोडणारा तो त्रिठ्ठा चांगलाच गजबजलेला होता. तिथून अर्ध्या तासावर होतं कर्नाटक राज्याच्या शेवटच्या टोकांपैकी एक, बंदीपूरचं जंगल...




बंदीपूर जंगलाच्या सुरुवातीलाच एक चेक पॉईंट होता. माफक टोल भरून गाडीने आत प्रवेश केला. पलिकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे तर पलिकडून या बाजूला येण्यासाठी जंगलातलाच दुसरा मार्ग आहे. त्यामुळे ट्रॅफिक जॅम वगैरेची भानगडच नाही. जागोजागी "वाहनातून उतरू नये..."
, "प्राण्यांना खायला घालू नये...", "शक्यतो हॉर्नचा वापर टाळावा...", "वाहनात गाणी लावली असल्यास आवाज वाहनापुरताच ठेवावा...", "जंगलातली शांतता आणि स्वच्छता राखावी..." अशा पाट्या कन्नड आणि इंग्रजी भाषेत लावलेल्या दिसल्या. जंगलाचा परिसर असल्याने अंधार लवकर होतो. त्यामुळे कर्नाटकच्या बाजूने जंगलाची एंट्री संध्याकाळी पाच वाजता बंद होते. तर पलिकडून तीच एंट्री साडेपाचला बंद होते...

नॅशनल पार्क किंवा झू मध्ये पिंजऱ्यात बंद असलेले प्राणी पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात प्राणी पाहण्यात वेगळीच मजा असते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडीत कधी हरणं, कधी वानरं, कधी मोठ्या खारी तर कधी हत्ती दिसत होते. या प्राण्यांखेरीज बी.आर.एस.एफ.चे (बंदीपूर रिझर्व्ह सिक्यूरिटी फोर्स) जवानही अधूनमधून दिसले. काही जवान झाडांवर किंवा झाडीत अशा प्रकारे लपतात की ते कोणाच्याही नजरेस पडत नाहीत. पण गरज भासेल तसे ते मदतीला हजर होतात. जंगलातून जाणारा तो घुमावदार रस्ता खूपच सुरेख होता. अतिशय स्वच्छ आणि खड्डेविरहित असलेला तो रस्ता स्वत:च एक मनोरम दृष्यासारखा होता...




अर्धा तास गेला असेल
, कर्नाटकची बॉर्डर दिसू लागली. बंदीपूर जंगलाचा दुसरा चेक पॉईंट. समोर अजून एक चेक पॉईंट होता. ती होती तामिळ नाडू राज्याची सुरुवात. मधुमलई जंगल. चंदन तस्कर वीरप्पनसाठी प्रसिद्ध असलेलं हे जंगल तामिळ नाडू राज्यात येतं. एका तीन फूट रुंदीच्या रस्त्याने ही दोन्ही जंगलं आणि दोन्ही राज्य विभागली गेली आहेत. बॉर्डर माणसांसाठी असते. जनावरांना त्याचं काहीही सोयर-सुतक नसतं. पण तरीही दोन्ही जंगलातली जनावरं दुसऱ्या जंगलात जात नाहीत. याच कारण म्हणजे जंगलांतलं तापमान आणि वनस्पती. बंदीपूरचं जंगल थोडं सपाट असताना मधुमलई जंगल मात्र चढत्या जमिनीवर आहे. बंदीपूर जंगलातल्या पाट्या इथेही आहेत. पण तामिळ भाषेत. पुन्हा तेच वळणदार रस्ते आणि शांत वातावरण. सोबत मधूनच हजेरी लावणारी हरणं, हत्ती आणि वानरं...



मधुमलईचं जंगल संपता संपता रस्त्यावर दुतर्फा काही जीप्स आम्हाला उभ्या दिसल्या. काही माणसं रस्त्याच्या मधोमध येऊन गाड्या अडवत होती. ही माणसं खाजगी जंगल सफारीसाठी जीप्स चालवणारे गाईड होते. चार ते पाच सीटची पूर्ण जीप घेतली तर रुपये २००० ते २३०० लागतात. माणशी जायचं झालं तर ७०० ते ८०० रुपये लागतात. हे गाईड आधी ड्रायव्हरला सफारीबद्दल विचारतात. मग प्रवाशांना सफरी घेण्याचा आग्रह करतात. त्या आग्रहात वाघ दाखवू
, बिबटे दाखवू असा दावा असतो. बहुतांश वेळी, "Tiger just pass by...", "He is now going towards deep forest...", "Hear the sound of his paws..." असेच संवाद ऐकायला मिळतात. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाऊ शकतो. या प्रलोभनापासून दूर राहणंच चांगलं...

जंगल संपलं आणि पाच-दहा मिनिटांच्या सपाट भागानंतर चढण सुरू झाली. हाच तो घाट जो सत्तरेक डोंगरांना पार करून ऊटीला पोहोचतो. घाटात आमच्यासोबत एक प्रसंग घडला. आमची गाडी एक वळण घेत आम्ही एका निमुळत्या रस्त्यावर पोहोचलो. समोर TN ही नंबर प्लेट असलेली तामिळनाडूची गाडी आली. KA लिहिलेली आमची कर्नाटकची गाडी पाहताच त्या गाडीवाल्याने आमच्या गाडीला खेटून गाडी थांबवली आणि रेज करू लागला. आमच्या गाडीला पूर्ण वळण रिव्हर्स गेयरमध्ये खाली उतर मागे गेलो. तामिळनाडूची गाडी तशीच आमच्या पुढून आली. रस्ता जरा मोठा झाला आणि त्या गाडीने आम्हाला पार केलं. कावेरी नदीवरून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात चाललेला वाद अशा मार्गानेही समोर येतो...

असो. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सिल्विहर ओकच्या झाडांमधून आमचा प्रवास सुरू होता. सिल्व्हर ओकची झाडं मागे गेली आणि निलगिरीच्या ऊंचच्या ऊंच झाडांनी आमचं स्वागत केलं. दरी, झाडी, थंडावा असं निसर्ग सौंदर्य अनुभवत आम्ही ऊटीला पोहोचलो. एकचा सुमार असल्याने आधी जेवणाची सोय करावी या विचाराने अडियार आनंद भवन या हॉटेलची आम्ही निवड केली. पोटभर जेवण झालं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. एक छोटासा घाट चढून तीनच्या सुमारास आम्ही हॉटेलवर पोहोचलो. "यह हसीन वादियाँ यह खुला आसमान..." असं मनोरम दृष्य हॉटेलमधून दिसत होतं. त्याच दृष्यातले विविध रंग न्याहाळत आमचा दिवस पार पडला...

१६.११.२०२३...

आज आम्हाला एका वेगळ्याच प्रवासाचा आनंद मिळणार होता. तो प्रवास होता टॉय ट्रेनचा. आमच्या टॉय ट्रेनची वेळ भर दुपारी १२:३५ची होती. कुनूर ते ऊटी असा आमचा प्रवास होणार होता. त्यासाठी कुनूरला कारने पोहोचायचं होतं. नाश्ता होईपर्यंत नऊ वाजले. कारने कुनूरला पोहोचायला तासभरच लागणार होता. म्हणून ऊटीमध्ये टी एँड चॉकलेट फॅक्टरी पहायला गेलो. ऊटीमध्ये बऱ्याच ठिकाणी चहाचे आणि कॉफीचे मळे आपल्याला पहायला मिळतात. त्याच मळ्यांच्या आसपास टी आणि चॉकलेट फॅक्टरी असते...




एका टेकाडावर स्थित बेन्चमार्क टी एँड चॉकलेट फॅक्टरी तिथल्या मोठ्या फॅक्टरींपैकी एक आहे. यात देन भाग असतात. पहिले आपण चॉकलेट विभागात जातो. तिथे काचेच्या आड आपल्याला वेगवेगळे मशीन आणि उपकरणं दिसतात ज्यावर केकोची पावडर तशी बनते
, मग पातळ लिक्वीड चॉकलेट कसं बनतं, त्यात वेगवेगळ्या गोष्टी मिसळून वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेटं कशी बनवली जातात हे आपल्याला दिसतं. तिथू आपण दुसऱ्या भागात जातो. ही असते टी फॅक्टरी. मळ्यातून आणलेली चहाची पानं सुकवणे, त्यीपासून चहाची पावडर बनवून वेगवेगळे फ्लेव्हर तयार करणे हे इथे दाखवलं जातं. फॅक्टरी पाहून आम्ही बाहेर पडलो तर आमच्या ड्रायव्हरने ट्रेन उशीरा असल्याचं सांगितलं. आम्ही तिथे फोन केला तेव्हा समजलं की ट्रेन १:४०ला सुटणार होती. चांगला तासभर अधिक मिळाल्याने आम्ही ऊटीमध्ये असलेलं डोड्डाबेट्टा पीक आणि कुनूरमधलं सीम्स पार्क बघायचं ठरवलं...




दक्षिण भारतातलं चौथ्या क्रमांकाचं आणि तामिळनाडूमधलं सर्वात ऊंच शिखर म्हणून डोड्डाबेट्टा पीक प्रसिद्ध आहे. तिथे जाण्याचा मार्गही मनोहर अशा निलगिरीच्या जंगलातून जातो. आपण जसजसे वर जातो तसं धुकं आपल्या सोबतीला येतं. या धुक्यामुळे तिथलं वातावरण आणि निसर्ग सौंदर्य एक वेगळीच ऊंची गाठतात. एका पॉईंटपर्यंत गाड्या जातात. तिथून पुढे लांब पण कमी ऊंचीच्या पायऱ्या आपल्याला स्पॉटपर्यंत घेऊन जातात. पायऱ्यांच्या दुतर्फा अनेक ठेले व दुकानं आहेत ज्यात निलगिरी तेल
, औषधी, टोप्या, हातमोजे, काठ्या, अशा पहाडी प्रदेशात मिळणाऱ्या वस्तू विकल्या जातात. वर जाताना पायऱ्या चढण्याचा थकवा आपल्याला जाणवत नाही. शिवाय तिथून दिसणारं दरी आणि डोंगरांचं मनोरम दृष्य आपल्याला अजून आनंद देतं...

डोड्डाबेट्टा पीक उतरून खाली आलो आणि लगेच कुनूरच्या मार्गाला लागलो. वाटेत एका ठिकाणी बोर्ड दिसला, "Eagle Dare Adventures' काय प्रकार आहे हे पहावं म्हणून थांबलो तर समजलं की वेगवेगळ्या वयोगटांसाठी 'rappeling', 'rock climbing', 'sky walk', 'zipline' अशी वेगवेगळी साहसं तिथे करायला मिळतात. 'Zipline' करायचं म्हणून आमचं कन्यारत्न मागेच लागलं. पण ट्रेन सुटेल हे कारण देऊन आम्ही वेळ मारून नेली आणि पुढे सरकलो. कुनूरला जाण्याच्या रस्त्यात 'Wellington Defense Services Staff College' होतं. तामिळनाडू मधल्या भारतीय सैन्याच्या या कॉलेज परिसरातून जाताना गणवेषधारी जवान, मोक्याच्या ठिकाणी असलेली मोर्चेबांधणी आणि तिथे तैनात असलेले बंदुकधारी जवान आणि जागोजागी फडकणारा तिरंगा पाहून एक वेगळं स्फूरण चढत होतं. फेटो काढण्याची परवानगी नसल्याने ते सर्व डोळ्यात आणि मनात साठवत आम्ही सिम्स पार्कला पोहोचलो...






सिम्स पार्क हे एक छानसं उद्यान आहे. गेटपासून सुमारे पन्नासेक पायऱ्या उतरून खाली गेल्यावर मुख्य उद्यान समोर येतं. इथे वेगवेगळी फुलझाडं
, लहानांना खेळायला घसरगुंड्या किंवा झोपाळे, असं बरंच काही आहे. शिवाय बोटिंगसाठी एक छोटंसं तळंदेखील आहे. मनसोक्त विहार करून आणि बरेच फोटो काढून आम्ही पार्कच्या बाहेर पडलो. साडे बारा वाजले होते. आमची कन्या म्हणाली भूक लागली. कुनूर स्टेशनच्या बाहेरच असलेल्या हॉटेलमध्ये जेवून आम्ही स्टेशनमध्ये शिरलो. अब इंतज़ार था तो बस टॉय ट्रेन का...

निलगिरी पॅसेंजर ही ट्रेन प्रामुख्याने टॉय ट्रेन म्हणून ओळखली जाते. मेट्टूपलायम आणि ऊटी हा २६ कि.मी.चा प्रवास या टॉय ट्रेनने होतो. जवळपास १६ बोगदे, २०८ वळणं आणि २५० पूल या ट्रेनच्या प्रवासात येतात. आकाराने लहान असल्याकारणाने कदाचित हिला टॉय ट्रेन म्हणत असावेत. दीड-दोन महिने आधी या ट्रेनचं बुकिंग फूल होतं. त्यामुळे ट्रेनचा आस्वाद घ्यायचा झाल्यास आगाऊ बुकिंग करणंच योग्य. ट्रेनला तीन साधे आणि एक स्पेशल असे चार डबे असतात. प्रत्येक डब्याचे दोन भाग असतात. प्रत्येक भागात दायहा सीट्स असतात आणि प्रत्येक भागाचा वेगळा दरवाजा असतो. उदा. सीट नंबर १ ते १०, पहिला भाग पहिला डबा पहिला. सीट नंबर ११ ते २०, दुसरा भाग पहिला डबा. त्यामुळे रिझर्व्हेशन करताना अळा पद्धतीने करा की सर्वांना एकत्र बसता येईल. ट्रेन सुरू असताना डोंगर, दऱ्या, निलगिरीची झाडं, विविध रंग लावलेली उतरणीवरची टुमदार घरं, एखादं सरोवर, अशी एकामागून एक सुंदर दृष्य आपल्या पाहण्यात येतात आणि आपण रममाण होतो. ऊटीमधला टॉय ट्रेनचा हा प्रवास खरंच अविस्मरणीय आहे...







ट्रेन ऊटीला पोहोचली आणि आम्ही कारने हॉटेलच्या दिशेने निघालो. वाटेत
'Tamilnadu Tourism Boating House' हा बोर्ड दिसला. झालं. आमच्या कन्येने बोटिंग करणाचा विचार मांडला. आयडिया छानच होती. झाडीने वेढलेल्या तिथल्या नयनरम्य तलावात बोटिंग करण्याचा मनमुराद आनंद आम्ही घेतला. आतातरी हॉटेलवर जायचं का असं विचारल्यावर त्यावेळी तरी आमची कन्या हो म्हणाली खरी. पर उसकी पिक्चर अभी बाकी थी दोस्तों. आमच्या हॉटेलपासून जवळ आणि 'Benchmark Tea & Chocolate Factory'समोर होतं 'Eagle Dare Adventures.' आमच्या कन्यारत्नाने सकाळी धरलेल्या हट्टाने पुन्हा डोकं वर काढलं...



होऊ दे मनासारखं म्हणून आम्ही आत गेलो. एका बिल्डिंगच्या सहा मजले इतक्या ऊंचीवर एक लांब तार असते. त्या तारेला तीन गोलाकार हुक असतात आणि त्या हुकांना तीन पट्टे असतात. ते पट्टे आपल्याभोवती बांधून पुन्हा हुकात अडकवले जातात आणि एका स्टँडवर आपल्याला धक्का दिला जातो. वीस सेकंदात आरण पलिकडच्या टॉव्हरपर्यंत जातो. मग तार बदलली जाते आणि पुन्हा वीस सेकंदात आपण परत येतो. मूळची चाळीस सेकंद आणि तयारीची पाच ते सहा मिनिटं
, असं एकून सात-आठ मिनिटांसं साहस आमचं कन्यारत्न निभावू शकेल का अशी शंका मनात होती. पण हे साहस लीलया पार करून या 'Eagle Dare Girl'ने नुसती आमचीच नाही, तर तिथल्या सर्वांची दाद मिळवली. कारण त्या दिवसभरात हे साहस एकट्याने करणारी वयाने सर्वात लहान आमची मुलगीच होती...

अशा प्रकारे निसर्ग, प्रवास आणि साहस यांनी भरलेला पण त्रास किंवा थकव्याचा लवलेश नसलेला हा भरगच्च दिवस पार पडला...

१७.११.२०२३...

१३ आणि १४ नोव्हेम्बर मैसुरू व १५ आणि १६ नोव्हेम्बर ऊटी, असा चढता प्रवास आणि छानदार ट्रिप झाल्यावर सतरा नोव्हेम्बरला आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आम्ही सकाळी ९:३० वाजता हॉटेल सोडलं. बेंगलूरूला पोहोचायला साधारण पाच तास लागणार होते. पुन्हा तो सत्तरेक डोंगरांना पार करणारा घाट, मधुमलईचं जंगल आणि बंदीपूरचं जंगल, हे सर्व लागणार होतं. घाट उतरताना दोन साईट्स आम्हाला पहायला मिळाल्या. एक होतं पाईन फॉरेस्ट, जिथे "राज़" या लोकप्रिय भयपटाच्या काही दृष्यांचं चित्रिकरण झालं होतं. दुसरं होतं एका टेकडीवर असलेलं एक पठार आणि एक पाऊलवाट वजा रस्ता, जिथे "मैंने प्यार किया" या चित्रपटासह अनेक चित्रपटातल्या दृष्यांचं आणि गाण्यांचं चित्रिकरण झालं होतं. शिवाय, टॉय ट्रेनच्या मार्गात येणारं 'लव्हडेल' हे स्टेशनही काही चित्रपटांमध्ये दिसतं...




उतरता घाट जवळपास तासाभरात पार पडला. थोड्याच वेळात मधुमलईचं जंगल लागलं. ऊटीला जातानाचा जंगलातला रस्ता हा दोन्ही जंगलातल्या एका भागात आहे. तर परतीचा रस्ता हा दुसऱ्या भागात आहे. थोडक्यात गर्दी आणि ट्रॅफिक टाळण्यासाठी दोन्ही रस्ते वन वे केलेले आहेत. दोन्ही जंगलातल्या या भागातली रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडी बऱ्यापैकी साफ केली आहे. त्यामुळे परतीच्या वाटेवर म्हणजे मैसूरूकडे जाणाऱ्या जंगलातल्या वाटेवर दिसणारी जनावरं बऱ्यापैकी रस्त्याच्या जवळ आलेली दिसतात. या भागात ते गाईड सापडत नाहीत याचं हेच कारण असावं...

दोन्ही जंगलं पार करून आम्ही शहराच्या दिशेला लागलो. सुमारे अर्धा तास प्रवास झाल्यावर आम्हाला एक गजबजलेला रस्ता लागला. रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना एकसारखी दुकानं होतं. ऊटीकडे पाठ करून आपण उभं राहिल्यावर आपल्या डाव्या हाताला केरळची संस्कृती आणि भाषा दर्शवणारी दुकान दिसतात. तर आपल्या उजव्या हाताला लागणाऱ्या दुकानांवर कर्नाटकची संस्कृती आणि भाषा दिसते. तो गजबजलेला रस्ता संपला आणि डावीकडे एक वळण दिसलं. त्या वळणावर दहा कि.मी. अंतरावर केरळ राज्याची सीमा लागते. तो रस्ता मागे सारून आम्ही सरळ निघालो. साधारण एक वाजता आम्ही मैसूरूला पोहोचलो. जेवण झालं आणि आम्ही बेंगलूरूच्या दिशेला लागलो...







बेंगलूरूला पोहोचताच शहरी ट्रॅफिकने आमचं स्वगत केलं. संथगतीने धावणाऱ्या गाड्यांमधून वाट काढत आम्ही तिथली विधान सभा ज्याला
'विधान सौदा' असं म्हणतात, ती पाहिली. चिन्नास्वामी स्टेडियम पाहिलं. तिथलं नेहरू तारांगण पाहिलं आणि 'Vishweshwaraya Industrial & Technological Museum'ला येऊन पोहोचलो. हे म्यूझियम खरंच पाहण्यासारखं आहे. कुलूप, झिप, बॉल पेन, स्विच उघडताना आणि बंद होताना आतलं तंत्र कसं काम करतं हे इथे छोट्या छोट्या मॉडेलद्वारे दाखवलं गेलं आहे. शिवाय Wright Brothersने तयार केलेल्या विमानाची प्रतिकृती, चांद्रयान ३ आणि विक्रम लँडरची प्रतिकृती, पेट्रोल आणि डिझेलच्या इंजिनांची प्रतिकृती. असं बरंच काही त्या दोन मजली इमारतीत आहे. म्यूझियम पाहून सुमारे तासाभरात आम्ही बाहेर पडलो आणि थेट पोहोचलो विमानतळावर. तिथे एयर आकासाची फ्लाईट आम्हाला मुंबईला परत घेऊन जायला सज्ज होती...

मुंबई एयरपोर्टवरून सुरू झालेली आमची ट्रिप, बेंगलूरू, मैसूरू, ऊटी आणि पुन्हा बेंगलूरू, असा सहा दिवस आणि पाच रात्रींचा हिरवळीतून घडलेला राजेशाही प्रवास करत पुन्हा मुंबई एयरपोर्टवर येऊन संपन्न झाली. इतिहास, निसर्ग आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी मुंबई-बेंगलूरू-मैसूरू-ऊटी-बेंगलूरू-मुंबई ही ट्रिप आम्हालाएका वेगळ्याच जगाचा अनुभव देऊन गेली...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Comments

Popular posts from this blog

पारंपारिक हिरवळ...

निसर्गाच्या सानिध्यात...

नयनरम्य संगमेश्वर-कोयना...