पारंपारिक हिरवळ...

पूर्व तयारी...

सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळीत कुठेतरी फिरायला जाण्याचे विचार मनात येऊ लागले. असं म्हणतात ना, की आपल्या मनात काही आलं, तर त्या दिशेने योग्य विचार करण्यासाठी सभोवतालचं वातावरण आपली मदत करतं. तसंच काहीसं माझ्यासोबत झालं. टी.व्ही. लावताच अचानक समोर दिसणारा एक चित्रपट, नव्याने उघडलेल्या एका हॉटेलमध्ये भिंतींवर लावलेली चित्र, कोणाच्यातरी मुखातून येणारे काही शब्द, या सगळ्यातून हे वातावरण आपल्याला केरळविषयी सुचवू पाहतंय हे लक्षात आलं. हा विचार मी बायको-मुलीला ऐकवला. त्यांनाही एका फटक्यात पटलं. गेल्या वर्षी संगमेश्वर-कोयना सहलीत आमच्यासोबत अजून एक कुटुंब होतं. याही वर्षी त्यांना विचारावं म्हणून प्रश्न टाकला. दोन दिवसांनंतर त्यांचं होकारार्थी उत्तर आलं. ठरलं तर मग. दोन कुटुंब मिळून सहा जण आणि केरळ हे ठिकाण...

केरळवर शिक्कामोर्तब झालं आणि प्रश्न आले किती दिवस जायचं, कोणते दिवस जायचं आणि कुठे जायचं. आम्ही ठरवलं सर्वांनी समोरासमोर भेटून चर्चा करू. सहलीची खरी मजा येते, ती ठरवा-ठरवीमध्ये. दोन्ही कुटुंब केरळला आधी जाऊन आली होती त्यामुळे त्यावेळचे अनुभव, गमती-जमती, पाहिलेली ठिकाणं यातून आमच्यातली चर्चा रंगत गेली. केरळ म्हटलं, की मुन्नार, थेक्काडी, आलेप्पी, ही ठिकाणं ओघानेच येतात. इथे नमूद करायला हवं, की तिकडची अंतरं खूप जास्त वेळ खाऊ आहेत. त्यामुळे प्रवासाला सोईस्कर ठिकाणं निवडणं गरजेचं होतं. सर्वांच्या सुट्ट्या धरून, जाण्याच्या तारखा आणि ठिकाणं नक्की झाल्यावर आम्ही वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यातून माहिती मागवली. सर्व माहितीपत्रकांमधून विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून आलेली माहिती आणि दर आम्हाला पटले. त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही अधिक माहिती मिळवली. आता प्रश्न होता फ्लाईटच्या उपलब्धतेचा आणि वेळेचा...

मुंबई ते कोची किंवा त्रिवेन्द्रमसाठी बऱ्यापैकी फ्लाईट्स आहेत. पण परतीच्या फ्लाईट्समध्ये त्रिवेन्द्रमवरून एखाद-दुसरी फ्लाईट आहे आणि कोचीवरून मात्र जास्त फ्लाईट्स आहेत. हे लक्षात येताच आम्ही आमच्या ट्रिपचा प्लॅन पूर्ण बदलला. आधी आम्ही कोचीला उतरून पुढची ट्रिप करणार होतो. पण आता त्रिवेन्द्रमला उतरण्याचं ठरलं. आमची दोन कुटुंब असल्याने आम्ही होणारा खर्च विभागून करायचं ठरवलं. त्यानुसार, हॉटेल आणि तिथे लागणाऱ्या गाडीचा खर्च मी करणार आणि फ्लाईट व मुंबई एअरपोर्ट ते घर, असा जाण्या-येण्याचा खर्च दुसरं कुटुंब करेल. जे काही कमी-जास्त होईल, त्याची मोज-माप ट्रिप संपल्यावर करायची असं निश्चित झालं. तिथली वेगवेगळी हॉटेल्स आम्ही इंटरनेटवर पालथी घातली. सर्वानुमते हॉटेल्स ठरली. विद्या टूर्सशी संपर्क साधून मी काही जुजबी पैसे आगाऊ भरले. तीन दिवसांनी विद्या टूर्सकडून हॉटेल्सची confirmation vouchers आली. तोवर दुसऱ्या कुटुंबाने जाण्या-येण्याची फ्लाईट बुकिंग सुद्धा करून घेतली...

मग सुरुवात झाली ती तयारीला. अर्थात खरेदीला. माझं ऑफिस आणि मुलीची शाळा सांभाळून सुट्टीच्या दिवशी खरेदीला जायचं. असं करत करत सप्टेंबर उजाडला. हॉटेल्सचे राहिलेले पैसे भरण्याची तारीख जवळ आली. अगदी शेवटच्या क्षणी नको, म्हणून विद्या टूर्सचे सगळे पैसे वेळेआधीच भरून टाकले. दोन दिवसात आम्हाला हॉटेल्सकडून final vouchers मिळाली. फ्लाईट्सची तिकीटं, हॉटेल्सची वाऊचर्स, खरेदी, वेब चेक-ईन, डी.जी.यात्रा ऍपवर बोर्डिंग पास अपलोड करणे, अशी सगळी जय्यत तयारी झाली आणि आम्ही सगळे ट्रिपसाठी सज्ज झालो. आता प्रतीक्षा होती, २१ ऑक्टोबरची...

२१.१०.२५...

सकाळी १०:३५ची इंडिगोची आम्ही फ्लाईट होती. सकाळी ७:१५ला आम्ही निघालो. थोडी लवकरची वेळ होती, पण एयरपोर्टवर सामानाची आणि आपली तपासणी यासाठी बऱ्यापैकी वेळ लागतो. त्यामुळे दोनेक तास आधी गेलं तर त्यानंतर निवांत बसता येतं. आमचं सगळी तपासणी झाली आणि ९:०० वाजता आम्ही आमच्या गेटवर येऊन पोहोचलो. गेट म्हणजे जिथे आमची फ्लाईट लागणार होती ती जागा...




दीड तासांची मिळालेली ती विश्रांती, अपुऱ्या झोपेची मरगळ घालवणारी ठरली. जरा ताजे होऊन आम्ही फ्लाईटमध्ये शिरलो. सुमारे १२:५५ला आम्ही त्रिवेंद्रमला पोहोचलो. सामान मिळायला वीस-पंचवीस मिनिटं गेली. आमच्या सामानांपैकी एका सूटकेसचं एक चाक तुटलेलं माझ्या तिथेच लक्षात आलं. विमानतळाच्या आत, त्यांच्या चुकीमुळे जर आपल्या सामानाचं काही नुकसान झालं तर आपल्या नुकसान भरपाई मिळते. एयरपोर्टवर Baggage Malfunction Desk असतो. तिथे जाऊन तुम्ही तक्रार केलीत तर चोवीस तासांच्या आत कार्यवाही होते. मी लगेच तिथे जाऊन तक्रार केली. पुढच्या चोवीस तासात मला रु. ३५००/-चं वाऊचर मिळेल अशी हमी तिथल्या कर्मचाऱ्याने मला दिली. तेव्हा सगळं सामान घेऊन आम्ही तिथून निघालो...

एयरपोर्टमधून बाहेर पडल्या-पडल्या बदलेल्या वातावरणाने आम्ही सुखावलो. आमचा ड्रायव्हर गाडी घेऊन तयारच होता. भर दुपारची वेळ असल्याने आम्ही सारे भुकावलो होतो. श्री आर्या नावाच्या एका हॉटेलात आम्ही पोटभर जेवलो. इकडच्या हॉटेल्सची एक गोष्ट छान आहे बरं का. थाळी मागवली तर पाच मिनिटात येते. पण अजून काही मागवलं तर मात्र वीसेक मिनिटं लागतात. जेवून बाहेर पडल्यावर हाऊस बोट सफर करायची आणि मग हॉटेल रूमवर जायचं असा बेत ठरला. भरतीमुळे आज सगळ्या हाऊस बोट राईड्स बंद होत्या. आमचा ड्रायव्हर म्हणाला इथून जवळच कोल्लम गावात शंकर-पार्वतीचं छान देऊळ आहे. शिवाय आळीमाला (Aazhimala) इथलं महादेव मंदिरही बघण्यासारखं आहे. ते बघून हॉटेलवर जावं. ड्रायव्हरची ही आयडिया आम्हाला पटली. कोल्लमच्या शिव-पार्वती मंदिराजवळ आम्ही पोहोचलो तेव्हा समजलं, मंदिर दुपारी बंद असतं आणि संध्याकाळी पाच वाजता उघडतं. आम्ही थोडे निराश झालो खरे, पण मग बाहेरूनच नमस्कार करून आम्ही आळीमालाच्या वाटेला लागलो...

आम्ही आळीमालाला पोहोचलोच होतो, की मस्तकावर भागीरथी असलेल्या जटाधारी भगवान शंकराची प्रचंड मूर्ती आम्हाला दिसली. त्या शिल्पापर्यंत पोहोचण्यासाठी जमिनीखाली एक भुयारी मार्गाने जावं लागतं. त्या भुयारी मार्गाचं तिकीट आहे माणशी रु. १००/-. दहा वर्षापर्यंतच्या बालकांना तिकीट नाही लागत. त्या गुहेत फोटो किंवा व्हिडियो काढणं यावर बंदी आहे. शिवाय मोठ्याने बोलणं, गाणी लावणं यावरही मज्जाव आहे. आम्हा सर्वांचे मोबाईल फोन्स एका पिशवीत भरून ती पिशवी सोबत घेऊन आम्ही आत प्रवेश केला. तिथे दगडात कोरलेली अनेक शिल्प आमच्या समोर होती. शिवाय एका विशिष्ट लईत ओंकारचा जप पूर्ण गुहेत घुमत होता...


भगवान शंकर व देवी पार्वती यांचा विवाह, शिवतांडव, पंचमुखी भगवान शंकर, पंचमुखी श्री गणेश, देवी भद्रकाली, देवी चंडिका, महर्षी परशुराम, काळभैरव, समुद्र मंथन, शिव-पार्वती यांचा प्रणय, दशानन रावण, श्री शंकरनारायण (भगवान शंकर आणि श्री विष्णू असं एकत्रित शिल्प) ही सगळी शिल्प आणि त्यासोबत कानावर पडत असलेला ओमकाराचा नाद, यामुळे अगदी भारावून टाकणारं ते वातावरण होतं. गुहेच्या दुसऱ्या बाजूने आम्ही बाहेर पडलो आणि अथांग समुद्र समोर होता. समुद्राचे वेगवेगळे फोटो काढत आम्ही भगवान शंकराच्या प्रचंड शिल्पापर्यंत पोहोचलो. तिथे थोडा वेळ थांबून, फोटो काढून आम्ही हॉटेलच्या दिशेने वळलो...

थकावटीने भरलेल्या एका छान दिवसाचा छान असा शेवट झाला. आता प्रतीक्षा होती २२.१०.२५, मुक्काम पोस्ट कन्याकुमारी...

२२.१०.२५...

आम्ही सकाळी लवकर उठलो. छान दवबिंदू सर्वत्र दिसत होते. शिवाय, पक्षांचे आवाजही येत होते. मॉर्निंग वॉक घेण्यात तासभर कसा गेला समजलंच नाही. ७:३० आमचा बुफे ब्रेकफास्ट तयार होता. पोटभर नाश्ता करून आम्ही आमच्या गाडीकडे वळलो. थोड्याच वेळात गाडी निघाली आणि तिने थेट कन्याकुमारीचा रस्ता धरला. त्याआधीच आमच्या ड्रायव्हरने आमची जुजबी माहिती विचारून घेतली. जुजबी माहिती म्हणजे गाडीतून जाणाऱ्या प्रत्येकाची नावं आणि वयं. कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये असल्याने केरळमधून तामिळनाडू पासिंगसाठी या माहितीची गरज होती. जवळपास अडीच तास प्रवास करून आम्ही स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या चौकात पोहोचलो. जिथून पुढे विवेकानंद रॉक मेमोरियलचा रस्ता सुरू होतो...



मुख्य चौकातून थोडं पुढे गेलं की उजव्या हाताला ट्रस्टचा बुकिंग काऊंटर आहे. विवेकानंद रॉक मेमोरियलकडे जाण्याचा रस्ता तोच असल्याने आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. इथे दोन प्रकारची तिकिटं मिळतात. एक आहे स्पेशल तिकीट, जे माणशी रु. ३००/-चं असतं आणि दुसरं असतं साधं तिकीट, जे माणशी रु. १००/-चं असतं. जाताना वेगळं आणि येताना वेगळं असतं तिकीट नसतं. दोन्हीही प्रवास एकाच तिकिटामध्ये होतात. आम्ही रु. १००चं तिकीट घेतलं आणि बोटीकडे गेलो. काठापासून आत असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलला जा-ये करण्यासाठी या फेरी बोटी तिथे सतत तैनात असतात. पाचंच मिनिटात आम्ही समोरच्या काठावर पोहोचलो. तिथे पुन्हा दर्शनासाठी रु. ३०/-चं तिकीट असतं. तिकीट खिडकीच्या थोडं पुढे चपला-बूट ठेवण्याची जागा आहे. शक्यतो वाहणा बाहेर न ठेवता तिथे असलेल्या काऊंटरलाच जमा कराव्यात. ही सेवा विनामूल्य आहे...


हे विवेकानंद रॉक मेमोरियल दोन मोठ्या खडकांवर उभारलेलं आहे. ही जागा भौगोलिक दृष्ट्या भारताच्या सीमेबाहेर आहे. पण तरीही हा भारताचाच भाग आहे. इथे आरबी समुद्र (Arabian Sea) आणि भारतीय महासागर (Indian Ocean) एकत्र येतात. एक कहाणी अशी, की याच खडकावर बसून देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी तप केला होता. शिवाय स्वामी विवेकानंद पोहत पोहत या खडकावर पोहोचले आणि इथेच त्यांना ज्ञान आणि बोधप्राप्ती झाली. इथे दोन मोठे मंडप आणि एक ध्यान मंडप आहे. त्या दोन मोठ्या मंडपांचं नाव आहे विवेकानंद मंडप आणि श्रीपाद मंडप. भर उन्हाचे आम्ही तिथे पोहोचलो, त्यामुळे पायाला चांगलेच चटके बसत होते. तेथे आवारात पांढऱ्या पट्ट्या आहेत. त्या पट्ट्यावर पाय ठेवल्यास चटके बसत नाहीत...

चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलवर उन्हाचा त्रास होतोच, पण तितकाच थंड हवेचा मारा होत असल्याने उष्णतेची जास्त जाणीव होत नाही. विवेकानंद मंडपात स्वामी विवेकानंदांची सुंदर मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर स्वामी विवेकानंद यांचे गुरू, श्री रामकृष्ण परमहंस यांची एक मोठी तसबीर आहे. मंडपाच्या आधी एका कोपऱ्यात एका चौथऱ्यावर आपल्याला एक पाऊल उमाटलेलं दिसतं. त्या पावलाला हळदी-कुंकू आणि फुलंही वाहिलेली दिसतात. असं म्हणतात, की हे पाऊल देवी पार्वतीचं आहे. जेव्हा देवी पार्वती इथे आल्या, तेव्हा काही क्षणांसाठी त्या ठिकाणी उभ्या राहिल्या होत्या. तेव्हा त्यांचं हे पाऊल इथे उमाटलं. गाभाऱ्यात एकदा प्रवेश केला, की तिथे फोटो काढणं वर्ज्य आहे. तिथले कर्मचारी डोळ्यात तेल घालून सर्वांवर नजर ठेऊन असतात. त्यामुळे गाभाऱ्यातले फोटो नाही काढता आले. विवेकानंद रॉक मेमोरियल मागे टाकून आम्ही पुन्हा त्रिवेंद्रमच्या दिशेने निघालो. आम्ही खूपच उत्साही होतो. करण आता बॅक वॉटर्स बोट राईड आमची वाट पाहत होती...

आम्ही कन्याकुमारी सोडलं आणि कानावर एक बातमी आली. ती बातमी होती एका चक्रीवादळाची, जे चेन्नईला येऊन धडकलं होतं. त्या चक्रीवादळचा थोडा तडाखा या बाजूलाही बसला. मुसळधार नाही, पण बऱ्यापैकी पाऊस लागला आम्हाला. आम्ही पूवरला पोहोचेपर्यंत पाऊस कमी होत अखेर थांबला. पूवर आयलॅण्ड्स रिसॉर्टजवळ अनेक बोट क्लब्स आहेत. तिथे एक तास ते दोन तासांच्या बोट राईड्स असतात. माणशी रु. ७००/- ते रु. ८००/- इतपत भाव असतात. शिवाय दहा वर्षांपर्यंत बालकांना तिकीट नसतं. इथे शिकारा बोटी आणि साध्या बोटी असे दोन प्रकार असतात. आम्ही रु. ८००/-ची शिकारा बोट ठरवली. एका संथ गतीने बोट पुढे जात राहते. वाटेत आम्हाला मॅनग्रोव्ज दिसले. तिथे एक चमत्कारीक फळ आम्हाला पहायला मिळालं. ते फळ होतं जंगली आंबा. हा आंबा म्हणे विषारी असतो आणि तो खाल्ला तर खाणारी व्यक्ती जिवानिशी जाते. नेय्यर नदी, नेय्यर धरण, वेगवेगळे पक्षी, त्यांचे आवाज असा तो निसर्ग अनुभवत आम्ही बीचवर आलो...



इथे सूर्यास्त लवकर होतो. सहा वाजता सूर्यास्त होईल असं सांगितलं गेलं. सूर्य जसा खाली जातो तसा तिथल्या वाळूचा रंग बदलतो. मावळत्या सूर्याची किरणं वाळूवर पडल्यावर सोनेरी रंगाची आभा दिसते. म्हणून या बीचला गोल्डन सॅन्ड बीच म्हणतात. त्या बीचवर लाटांचा, लाटांच्या गाजेचा, तिथल्या वातावरणाचा, उंटाच्या सफरीचा मनमुराद आनंद घेऊन त्याच शिकारा बोटीने आम्ही हॉटेलवर परतलो. दिवसाची सुरुवात जितक्या उत्साहात झाली, शेवटही तितकाच गोड झाला. उद्या म्हणजे २३.१०.२५ रोजी पूवर आयलँड्स रिसॉर्ट सोडून आम्हाला वॅगाममॉनला प्रस्थान करायचं होतं. त्यामुळे आवरा-आवर करून आम्ही लवकर झोपी गेलो...



२३.१०.२५...

सकाळी पोटभर नाश्ता करून आम्ही लागोलग आमच्या गाडीकडे गेलो. वॅगामॉन डोंगरात वसलेलं एक गाव आहे आणि तिथे पोहोचायला जवळपास ३ ते ४ तास लागणार होते. शिवाय तिथे जाण्याआधी आम्ही दोन ठिकाणं पाहून जाणार होतो. त्यामुळे अजून वेळ लागणार होता. म्हणून आमची घाई सुरू होती...


चेंकल येथे असलेल्या महेश्वरच्या शिव-पार्वती मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं. आज ते प्रत्यक्षात पहायला मिळणार याचा जास्त आनंद होता. आम्ही देवळापर्यंत पोहोचलो आणि एका भल्यामोठ्या पिंडीने आमचं स्वागत केलं. मुख्य प्रवेशद्वारापासून बऱ्यापैकी आत असलेली ही पिंडी जगातली सर्वात ऊंच पिंडी आहे असं म्हणतात. या पिंडीला दक्षिण कैलास असंही म्हणतात. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला मोठा गाभारा आणि सोबतच शिव-पार्वतीचं देऊळ आहे. पहिल्यांदाच इथे मी शंकराची मूर्ती पाहिली. अर्थात गाभाऱ्यातून आत प्रवेश करताच फोटो काढण्यावर बंदी आहे. पण तो परिसरच डोळ्यात साठवण्यासारखा आहे. काळ्या दगडात कोरलेल्या शिव-पार्वतीच्या मूर्तीसोबत इथे भगवान कार्तीकेय, श्री गणपती यांच्या ३२ मूर्ती, आणि बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आपलं लक्ष वेधून घेतात. महादेवाच्या तब्ब्ल १०८ पिंडी इथे आहेत. शिवाय भगवान शंकराची ६४ रूपंसुद्धा आपल्याला पहायला मिळतात. गाभारा फिरून आम्ही बाहेर आलो तर तिथे नवंग्रह बसवले आहेत. त्यांच्याच बाजूला तिकीट काऊंटर आहे. तिकीट घेऊन पिंडीच्या आत जाता येतं...




पिंडीच्या आत गेल्यावर आपल्याला प्रथम अष्टचक्रांचं दर्शन घडतं. तसंच आपण अजून वर जातो आणि कैलास पर्वतापर्यंत पोहोचतो. कैलास पर्वतातून आपण एका मार्गाने पवनपुत्र हनुमानाच्या पोटात शिरून खाली उतरत जातो. तिथे आपल्याला अष्टलक्षमींचं दर्शन घडतं. साधारण पाऊणेक तासाचा तो संपूर्ण प्रवास आपल्याला पूर्ण भारावून टाकतो. अखेर आपण पिंडीच्या बाजूला असलेल्या डोंगरातून बाहेर येतो ते ॐ नमः शिवाय हा जप करतच. एरवी इथे तुरळक गर्दी असते. पण महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते. जवळपास १०००-१२०० भाविक इथे दर्शनाला येतात. ती माहिती, पिंडीचे फोटो आणि पिंडीच्या आतलं वातावरण या सगळ्याने मोहित झालेलो आम्ही देवळातून बाहेर पडलो आणि जटायूकडे निघालो...



'जटायू अर्थ सेंटर' समुद्र सपाटीपासून जवळ-जवळ ११५० फूट वर एका टेकाडावर स्थित आहे. पक्ष्याचं सर्वात मोठं शिल्प असल्याचा मान टेकाडावर असलेल्या जटायूच्या शिल्पाला मिळाला आहे. वर जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर तिकीट काऊंटर आहे. जर माणशी रु. ३२५/-चं तिकीट काढलं, तर जवळपास ८०० पायऱ्या चढून आपण शिल्पापर्यंत पोहोचू शकतो. पण माणशी रु. ५५५/-चं तिकीट काढल्यास केबल कारने थेट शिल्पापर्यंत आपण पोहोचतो. संपूर्ण केरळमध्ये ही एकमेव केबल कार आहे. आम्ही गेटवर पोहोचलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. तिकीट मिळवायला तासभर लागणार होता. शिवाय केबल कर मिळवायला अजून पाऊणेक तास आणि वर अजून तासभर. असं साधारण अडीच तासांचा कार्यक्रम होता. आम्हाला पुढे आमचं हॉटेल गाठायचं होतं जे पाच तासांवर होतं. पोहोचायला रात्र झाली असती. तेव्हा आम्ही जटायू टॉपला जायची आयडिया रद्द केली आणि जेवायला म्हणून एका हॉटेलमध्ये शिरलो. पोटभर जेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. साधारण संध्याकाळी सहा वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो...

प्रवासाचा क्षीण चांगलाच जाणवत होता. जेवणाची वेळ होईपर्यंत रूमवरच आराम केला. उद्याच्या दिवसाचा म्हणजे २४.१०.२५चा आराखडा तयार करत आम्ही झोपी गेलो...

२४.१०.२५ आणि २५.१०.२५...

२४.१०.२५...

आज आम्ही सगळे जामच उत्साहात होतो. आज साहसी कृत्यांचा दिवस होता. पण आमच्या उत्साहावर सकाळीच पाणी पडलं ते संततधार पावसामुळे. पहाटे पाचपासून जो पाऊस सुरू झाला तो थांबेच ना. आमचा नाश्ता झाला तेव्हाही पाऊस पडतच होता. मग आम्ही विचार केला, पाऊस थांबेस्तोवर आपण वाशिष्ठ-अरुंधती मंदिर, टी फॅक्टरी आणि चहाचे मळे पाहू. नाश्ता करून आम्ही आमच्या मार्गला लागलो...



मंदिराकडे जाण्याचा रस्ता फारच नयनरम्य होता. एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला धबधबे असलेला डोंगर. आणि सोन्याहून पिवळं की काय, धुकं आणि थंडगार हवा यांनी सौंदऱ्यावर कळस चढवला. साधारण तासभराचा ड्राईव्ह झाल्यावर आम्ही इडुक्की तालुक्यातल्या एलाप्पारा रस्त्यावर असलेल्या श्री अरुंधती-वाशिष्ठ मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो. आमचं स्वागत केलं नटराज रूपात असलेल्या श्री गणेश मूर्तीने. गणपतीला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. लाल दगडाच्या काही पायऱ्या आम्हाला समोर दिसल्या. तिथल्याच एका माणसाला आम्ही किती पायऱ्या आहेत असं विचारलं तर उत्तर मिळालं, व्हेरी लेस व्हेरी लेस. जस्ट हण्ड्रेड. हळू हळू आम्ही चढायला सुरुवात केली. थोडं वर गेल्यावर आमच्या लक्षात आलं, या फक्त शंभर पायऱ्या नसाव्यात. थकवा जाणवत होता. पण सभोवारचं दृश्य आणि थंडगार हवा यामुळे आम्ही पुढे जात राहिलो...





अखेर पायऱ्या संपल्या आणि खडकाळ मातीचा रस्ता सुरू झाला. ती थोडी चढण पूर्ण केल्यावर एक पठार लागलं आणि त्यावर एक आडवा वाडा दिसला. हेच होतं श्री अरुंधती-वाशिष्ठ मंदिर. मंदिर बंद होतं. पण ते आवार आणि तो परिसर इतका सुंदर होता की चढणीचा सगळा क्षीण निघून गेला. परत जाताना आम्ही पायऱ्या मोजायचं ठरवलं. एकूण ४५९ पायऱ्या होत्या. आम्ही मनोमन त्या रहिवाशाला बोल लावले. पण दुसऱ्यांदा विचार केला तर लक्षात आलं, कदाचित त्याने आधीच आम्हाला ४०० पायऱ्या सांगितल्या असत्या तर कदाचित आम्ही जाण्याचा विचार सोडून दिला असता. पण त्या रहिवाशाच्या चुकीच्या उत्तरामुळे आम्ही नेटाने चढलो आणि ते देऊळ गाठलं हे खरं...

देऊळ मागे टाकून आम्ही Adventure Parkच्या दिशेने वळलो. या Adventure Parkसाठी दोन तिकिटं असतात. एक म्हणजे पार्किंग आणि दुसरं असतं आत प्रवेश करण्यासाठी. आत गेल्यावर प्रत्येक activityसाठी वेगळं तिकीट घ्यावं लागतं. आम्ही तिथे पोहोचलो तर Glass Bridge, Zip Line आणि इतर काही activities, हवामानामुळे बंद होत्या. आम्ही VR Video, आणि Archery या दोन activities पूर्ण केल्याच होत्या, की वादळ-वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. तेव्हा बाकी activitiesसुद्धा काही काळासाठी बंद केल्या गेल्या. Activities पुन्हा सुरू होईपर्यंत आम्ही थांबू शकत नव्हतो. तेव्हा नाईलाजाने आम्ही तिथून बाहेर पडलो. सगळ्या activities झाल्या नसल्या तरी जवळपास पाचशे पायऱ्यांची चढण, VR Video आणि Archery या activities झाल्या असल्याने दिवस सार्थकी लागला असं मानायला हरकत नव्हती...



दमछाक करणारा दिवस जसा संध्याकाळच्या कुशीत शिरला, तसे आता घराचे वेध लागायला सुरुवात झाली. हॉटेलवर येऊन आम्ही पुन्हा पॅकिंग सुरू केली. यावेळची पॅकिंग मात्र थोडी निरुत्साही होती. कारण ट्रिप संपल्याची खंत मनात होती. परतीच्या प्रवासाचे मनसूबे मनात तयार करत दिवसाचा शेवट झाला...

२५.१०.२५...

आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस होता. आम्ही आमच्या हॉटेलच्या रिसेप्शनवर विनंती करून एक तास जास्तीचा मागून घेतला. व्यवस्थित पॅकिंग करून आम्ही बारा वाजता आमचा परतीचा प्रवास सुरू केला. साधारण दुपारी दोन वाजता आम्ही कोचीजवळच्या सर्वाणा भवन या शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये जेवलो. या हॉटेलात केळ्याच्या पानावर जेवण वाढलं जातं. तीन भाज्या, भात, दही, लोणचं, सांडगी मिरची, केरला परोठा किंवा पोळी, एखादा गोडाचा पदार्थ आणि केरला पापड असे जिन्नस असतात. डोशांबाबत मात्र इथे थोडा गोंधळ आहे. नीर डोसा विचारला असता घी रोस्ट डोसा दिला जातो. तसं पहायला गेलं, तर नीर डोसा आणि फिल्टर कॉफी हे दोन जिन्नस मला कुठेच मिळाले नाहीत. जिथे जावं तिथे इन्स्टंट कॉफी आणि साधा किंवा मसाला डोसाच मला मिळाले. जेवण करून आम्ही बाहेर पडलो तर साडेतीन वाजले होते. कोचीहून आमची फ्लाईट रात्री दहाची होती. त्याप्रमाणे रात्री आठपर्यंत आमच्याकडे वेळ होता. साडेचार तास काय करायचं हा प्रश्न होता. आमच्या ड्रायव्हरने लूलू हायपर मॉलचं नावं सुचवलं. अनायसे वेळ काढायचा होताच. लूलू मॉलवर सर्वांचं शिक्कामोर्तब झालं आणि गाडी त्या दिशेने धावू लागली...

कोची एयरपोर्टपासून साधारण वीसेक मिनिटं आधी हा मॉल आहे. आम्ही लूलू मॉलला पोहोचलो. पार्किंगमध्ये गाडी लावली आणि मॉलमध्ये जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरलो. तीन-चार वेळा लिफ्टने वर-खाली करूनही मॉल दिसेना. दार उघडलं की गाड्याच गाड्या दिसत होत्या. आमची घालमेल पाहून कोणीतरी आम्हाला सांगितलं, तेव्हा खरा प्रकार आमच्या लक्षात आला. लूलू मॉलच्या दोन इमारती आहेत. पहिली इमारत जी मुख्य रस्त्यावर आहे, ती संपूर्णपणे पार्किंगसाठी आहे. त्याच इमारतीच्या मागे एक आडवी इमारत आहे. तो खरा लूलू मॉल आहे. पार्किंगमध्ये गाडी लावल्यावर पुन्हा बाहेर येऊन डाव्या बाजूने गेलं की मॉलचं प्रवेश द्वार आपल्याला दिसतं. आम्ही मॉल फिरलो. फूड कोर्टमध्ये एका ठिकाणी आम्हाला आयस्क्रीम पार्लर दिसला. ट्रिपचा शेवट गोड करावा म्हणून सर्वांनी आयस्क्रीम मागवलं...

Sharing is caring म्हणत आयस्क्रीम खाईपर्यंत साडेपाच वाजले. आयस्क्रीम संपवून आम्ही परत निघालो. हा लूलू मॉल इतका गुंता-गुंतीचा आहे, की आत कुठून शिरलो आणि बाहेर कुठे पडायचं ते कळतच नव्हतं. थोडं गोल-गोल फिरून आम्ही शेवटी एका कर्मचाऱ्याला बाहेर जाण्याचा मार्ग विचारला. पहिल्यांदाच पूर्ण व्यवस्थित हिंदी बोलणारा कर्मचारी आम्हाला भेटला. त्याने आम्हाला बरोब्बर मार्गला लावलं. मॉलमधून आम्ही बाहेर आलो आणि ट्रॅफिकमधून मार्ग काढत साधारण सात वाजता आम्ही एयरपोर्टला पोहोचलो. परंपरा जपलेल्या एका निसर्गरम्य सुंदर ट्रिपची छान सांगता झाली...

हॉटेल्स, सृष्टी सौंदर्य, खाद्य आणि भाषा...

हॉटेल्स...

विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा माझ्या बँकेचा खातेदार आहे. त्यांच्याकडूनच मी राहण्याच्या दोन्ही हॉटेल्सचं बुकिंग केलं. आगाऊ भरलेले काही पैसे आणि नंतर केलेलं फायनल पेमेंट, असं मिळून, दोन रात्री दोन दिवसांचे पूवर आईलॅण्ड्स रिसॉर्टचे रु. ६८५००/- झाले आणि व्हॅनिला काऊंटीच्या दोन दिवस दोन रात्रींचे रु. ५८५००/- झाले. एकूण तब्ब्ल रु. १२७०००/- ने खिसा हलका झाला होता आमचा. अर्थात, हे पैसे दोन परिवार मिळून होते...

पूवर आयलॅण्ड्स रिसॉर्ट...

त्रिवेंद्रम विमानतळापासून सुमारे तासभर अंतरावर पॉझियूर येथे स्थित आहे पूवर आयलॅण्ड्स रिसॉर्ट. नावाप्रमाणेच हे हॉटेल एका छोट्या बेटावर वसलेलं आहे. या रिसॉर्टला, पार्किंग १ आणि पार्किंग २ अशी दोन प्रवेशद्वारं आहेत. पार्किंग १ हे, कन्याकुमारीच्या बाजूला हॉटेलपासून साधारण वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. आणि पार्किंग २, त्रिवेंद्रमच्या बाजूला सुमारे पंधरा मिनिटांवर आहे. हॉटेलवर जाण्यासाठी बोटींचा वापर केला जातो. इथल्या या बोटी हॉटेल स्टाफ आणि पाहुण्यांची ने-आण करण्याचं काम विनामूल्य करतात. यांच्या एकूण चार बोटी आहेत. दोन पार्किंग १ वर तर दोन पार्किंग २ वर असतात...


हॉटेलला जायचं असेल किंवा बाहेर मुख्य रस्त्यावर यायचं असेल तर याच बोटींचा वापर करावा लागतो. अर्थात प्रत्येक बोटीवर एक चालक असतो. या हॉटेलमध्ये दोन प्रकारच्या रूम्स मिळतात. एक आहे फ्लोटिंग रूम्स ज्या संपूर्णपणे पाण्यावर तरंगत राहतात. या रूम्स मुख्य हॉटेलच्या बाहेर आणि बीचजवळ आहेत. पण एका जाड दोराने त्या रूम्स किनाऱ्याशी जोडलेल्या असतात. त्यामुळे त्या वेगळ्या होत नाहीत. दुसऱ्या प्रकारच्या रूम्स म्हणजे हॉटेलच्या आवारात असलेल्या वेगवेगळ्या रूम्स आणि विलाज. इथे स्वतंत्र कॉटेजेस पण आहेत...


आम्ही दोन कुटुंब मिळून सहा व्यक्ती होतो. त्यामुळे दोन रूम्स बुक केल्या होत्या. आम्हाला फ्लोटिंग रूम्स नाही मिळू शकल्या आणि कॉटेज पण उपलब्ध नव्हते. तेव्हा आम्हाला रिसेप्शनच्या मागे असलेला स्विमिंग पूल आणि छोटा तलाव यांच्या मधोमध असलेल्या विलामध्ये बाजू-बाजूच्या दोन रूम्स मिळाल्या. आम्ही हॉटेलवर पोहोचलो, तेव्हा शंख-शिंपल्यांची माळ, टिळा असं आमचं पारंपारिक पण जंगी स्वागत झालं. आमच्या बुकिंगमध्ये फक्त ब्रेकफास्ट होता. पण हॉटेलच्या आत-बाहेर करणं तितकं सोपं नसल्याने आम्ही रात्रीचं जेवणही तिथेच घेण्याचं ठरवलं. केरळमधले बहुतांश हॉटेल्स शाकाहारी आणि मांसाहारी असतात. पण तरीही शाकाहारी पदार्थही रुचकर असतात. तसेच या हॉटेलमध्ये सुद्धा शाकाहारी पदार्थ छान होते. थोडे महाग होते, पण मुबलक प्रमाणात होते...



खान-पान सेवेशिवाय, Fish Spa, योग वर्ग, लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळ, आयुर्वेदिक हॉस्पिटल, Archery अशा अनेक activities इथे करायला मिळतात. या शिवाय एक सोडून चार स्विमिंग पूल्स इथे आहेत. यातले दोन पूल्स तर चक्क कॉटेजेसच्या आत आहेत. प्रचंड मोठा हा परिसर, दिवसा जितका छान दिसतो, रात्री केलेल्या वेगवेगळ्या प्रकाश योजनेमुळे हा परिसर तितकाच अधिक सुंदर दिसतो. दुपारी चार ते संध्याकाळी सहा, इथे High Tea आणि snacks सुद्धा ठेवलेले असतात. बोट जेट्टीजवळ एका कॉटेजवजा शेडमध्ये हा high tea आयोजित केला जातो...

इथे घालवलेले दोन दिवस आणि दोन रात्री, राजेशाही होते हे तर नक्कीच...

व्हॅनिला काऊंटी...

वॅगामॉन गावाच्या साधारण १२ किलोमीटर आधी, टिकॉय नावाचं एक खेडं आहे. तिथे थॉमस एदाथी म्हणून एक शेतकरी होते. मुख्य रस्त्यापासून थोडं आत, त्यांचा, व्हॅनिला काऊंटी नावाचा एक टुमदार बंगला होता. मि. थॉमस तिथे फळं, भाज्या आणि मसाल्याच्या वृक्षांची लागवड करायचे. गावाकऱ्यांनी मि. थॉमसला त्या बंगल्याचं हॉटेलात रूपांतर करण्याचे फायदे सांगितले. ते त्यांना पटले. मग त्याच बंगल्यातल्या तीन खोल्या ते पर्यटकांना भाड्याने देऊ लागले. करता करता मि. थॉमसने तो पूर्ण बंगला पर्यटकांसाठी खुला केला. आज मि. थॉमस एदाथी यांची तिसरी पिढी, म्हणजे त्यांचा नातू मॅथ्यू एदाथी आणि त्यांची नात-सून सीलू एदाथी तितक्याच तन्मयतेने आणि आत्मीयतेने हा डोलारा सांभाळत आहेत...


या हॉटेलच्या मुख्य बंगल्यात रिसेप्शन आणि शिवाय चार खोल्या आहेत. बंगल्याच्या बाजूला जेवणावळ आणि त्याच्या बाजूला एक स्वतंत्र कॉटेज आहे ज्यात दोन खोल्या आहेत. कॉटेजपासून थोड्या वरच्या बाजूला अजून एक छोटं कॉटेज आहे जिथे कॅरम आणि इतर बैठे खेळ ठेवलेले आहेत. त्या कॉटेजच्या बाजूला तीन खोल्यांचं एक स्वतंत्र घर आहे, ज्यात एदाथी कुटुंब स्वतः वास्तव्य करतं. हॉटेल परिसरापासून सुमारे दोन किलोमीटर बाहेर असलेल्या त्यांच्या शेताजवळ पर्यटकांसोबत असलेल्या ड्रायव्हर्ससाठी राहण्याची उत्तम सोय केलेली आहे. या हॉटेलमध्ये आधी स्विमिंग पूल नव्हता. मि. मॅथ्यू एदाथीने तो नंतर बांधला. म्हणून तिथे जाण्याचा मार्ग थोडा चढणीचा आणि आड वळणाचा आहे. पण तरीही, तो मार्ग हॉटेल परिसराच्या आत असल्याने काहीच धोका जाणवत नाही...


हॉटेलमध्ये सोळा कर्मचारी आहेत. काही तिथल्या परिसराची देखभाल करतात. काही पर्यटकांची देखरेख करतात, काही शेताकडे बघतात तर काही खान-पान सेवा पाहतात. रूम्स, लॉन, जेवणावळ, रिसेप्शन, सगळं ठेवणीतलं आहे. जुनाट ख्रिस्त पद्धतींना आणि परंपरेला साजेसं आहे. हॉटेल बाहेरच्या रस्त्याच्या एका बाजूला दरी आहे तर दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. मधून जाणारा तो रस्ता म्हणजे स्वतःच एक मनोरम अनुभव आहे. जाता-येता ऐकू येणारे पक्षांचे आवाज, वेगवेगळी फुलं, पानं, झाडं, यांमुळे तिथलं वातावरण अधिकच सुखावह होतं...


ब्रेकफास्टसाठी इथे फारशी विविधता आढळत नाही. पुट्टू, इडियप्पम किंवा साधा डोसा, तीन प्रकारचे ब्रेड आणि तळून पाकात घोळवलेले केळ्याचे काप. शिवाय मसाला चहा आणि इन्स्टंट कॉफी असतेच. जेवणासाठी त्यांचा वेगळा मेनू आहे. पण ब्रेकफास्ट सोडून इतर ऑर्डर द्यायची झाल्यास त्यांना दोनेक तास आगाऊ सांगावं लागतं. वॅनिला काऊंटी हा होम स्टे असल्याने जिन्नस बनवायला कर्मचाऱ्यांना वेळ लागतो. पण सर्वच पदार्थ फारच रुचकर आणि व्यवस्थित प्रमाणात असतात...

दोन्ही हॉटेल्समध्ये चेक-ईन दुपारी दोनचं आहे तर चेक-आऊट सकाळी अकरा वाजता असतं. दोन्ही हॉटेल्सच्या सर्व कर्मचाऱ्यांची आमच्याशी किंवा इतर पर्यटकांशी वागण्या-बोलण्याची पद्धत फारच नम्र आणि आपलेपणा दाखवणारी होती. आमचं काम आहे म्हणून आम्ही ते करतोय असं कोणीच आम्हाला जाणवू दिलं नाही. उलट तिथलं राहणं पर्यटकांसाठी जास्त सोईस्कर कसं होईल याकडेच सर्वांचं लक्ष होतं...

सृष्टी सौंदर्य...

केरळ म्हटलं, की डोंगर-दऱ्या आणि हिरवळ आलीच. शिवाय वेगवेगळे समुद्र किनारेही ओघाने येतातच. जिथे पहावं तिथे हिरवळ आच्छादित डोंगर, उतरणीवर असलेले चहाचे मळे, धुकं, वेगवेगळे पक्षी, आणि त्यासोबतच गारठा आमची साथ देत होता. या सृष्टी सौंदर्यासोबतच तिथे अजून एक गोष्ट खूप छान होती. ती गोष्ट म्हणजे केरळमधली स्वच्छता. साफ-सुधरे रस्ते, घरं तर होतीच, पण साध्या टपऱ्या ही स्वछ होत्या. मुख्य म्हणजे कोणीही रस्त्यात थुंकताना आम्हाला दिसलं नाही. समुद्र किनाऱ्याचे रस्ते सोडल्यास प्रवासाचा अधिकाधिक भाग हा डोंगराळ आणि वळणदार रस्त्यांचा आहे. त्यामुळे खाऊन-पिऊन लगेच प्रवास करणं शक्यतो टाळावं...



आम्ही जितकी सारी देवळं तिथे पाहिली, त्यात एक गोष्ट जाणवली. इथे, म्हणजे केरळच्या या भागात मुखत्वे भगवान शंकर आणि देवी पार्वतीची मंदिरं जास्त आहेत. भगवान कार्तिकेय आणि श्री गणेश यांची देवळं क्वचितच पाहिली आम्ही. देवळातही परंपरा, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा व्यवस्थित जपला आहे. इथली सगळी मंदिरं साधारण मंदिरासारखी नसून चक्क कौलारू घरांसारखी असतात. त्यातले देखावे, मुर्त्या अतिशय सुंदर असतात...

खाद्य...

केरळमधली खाद्य संस्कृती वेगळीच आहे. नेहमीचे मेदू वडा, बटाटा वडा, भजी, पनीरच्या विविध भाज्या इथे फारच कमी मिळतात. मिसळ, थालीपीठ हे प्रकार तर नाहीच. पण रस्सम, पुट्टू, डोसे, इडल्या, इडियप्पम, उथप्पम हे प्रकार अतिशय सुंदर आणि मुबलक असतात. नान, रोटी, परोठे हे ब्रेडचे प्रकार असतात पण त्यातही केरला पराठा हा प्रकार तर सुंदरच असतो. शिवाय तळलेला केरला पापड इथे न विसरता खावा. इथे थाळीला मील म्हणतात. ती थाळी वाढण्याची पद्धत तर मस्तच आहे. आपल्यासमोर केळ्याचं मोठं पान ठेवलं जातं. त्यावर एकेक करून जिन्नस वाढले जातात. आपण एखादा जिन्नस परत मागवला तरी त्याचे वेगळे पैसे नसतात. म्हणून ही अनलिमिटेड थाळी किंवा मील आपण मिळून मिसळून नाही खाऊ शकत...

भाषा...

केरळमध्ये मल्ल्याळम ही भाषा जास्त वापरली जाते. इथल्या रहिवाशांना त्यांच्या भाषेबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. त्यामुळे सांभाषण सुरू करताना स्थानिक रहिवासी त्यांच्याच भाषेत बोलायला सुरू करतात. इथले उच्चारही थोडे वेगळे असतात. उदाहणार्थ Azhimalla या शब्दाचा उच्चार आपण आझीमाला असा करू. पण तिथे मात्र तोच उच्चार आळीमाल्ला असा केला जातो. तुटक तुटक इंग्रजी आणि हिंदी भाषा वापरली जाते. पण त्यांच्यावरही मल्ल्याळम भाषेचा प्रभाव असतो. त्यामुळे इथे संभाषण थोडं कठीण जातं. तिथे गेल्यावर तिथला एखादा स्थानिक जाणकार जर सोबत असेल तर समोरच्या व्यक्तीला गोष्टी समजावून सांगणं जरा सोपं जातं...

बाकी पर्यटनासाठी केरळ हे उत्तम ठिकाण आहे. बॅक वॉटर्स, चहाचे मळे, डोंगर-दऱ्यांवर पसरलेलं धुकं, समुद्र किनारे, नद्या आणि स्वच्छता, सगळंच उच्चं दर्जाचं आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Comments

Popular posts from this blog

निसर्गाच्या सानिध्यात...

नयनरम्य संगमेश्वर-कोयना...