निसर्गाच्या सानिध्यात...

शहरी धकाधकीपासून लांब जाण्याचा आणि निसर्गाच्या थोडं जवळ जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. शनिवार आणि रविवार जोडून आलेली सुट्टी, शिवाय में महिन्याचा शेवटचा निवांत शनिवार, त्यामुळे काय करावं, कुठेतरी जावं का... हे विचार आमच्या मनात घोळत होते. आमच्यातल्याच एकाने आकाश म्हडगूत या माणसाचं नाव सुचवलं. नेचर वॉक, नेचर हाईक, असे अनेक उपक्रम आकाश राबवतो. त्यातलाच एक आहे मुंडा डोंगर नेचर हाईक...


बुधवारी आमचा विचार पक्का झाला. गुरुवारी आकाशशी बोलणं झालं आणि शुक्रवारी पैसे भरून, मी, माझी बायको, माझी मुलगी आणि आमचे अजून दोन नातेवाईक शनिवारी म्हणजेच २४.०५.२५ रोजी होणाऱ्या या हाईकसाठी सज्ज झालो. बोरिवलीवरून घोडबंदर रोडकडे वळल्यावर, सुमारे १५ किलोमीटरवर काजूपाडा आहे. तिथूनच जवळ आहे मुंडा डोंगर. सकाळी ८ वाजता काजूपाडा बस थांब्याजवळ भेटायचं ठरलं. आम्ही एकदम वेळेवर तिथे पोहोचलो. आकाश आमची वाटंच पाहत होता. अजून काही मेंबर गोळा झाले आणि आमची नेचर हाईक सुरू झाली. काजूपाडा बस थांब्याच्या बाजूलाच दोन छोटी हॉटेल्स (ढाबे) आहेत, जिथे पार्किंग करता येतं. बाकी कुठेही, गाड्या उभ्या राहू शकतील अशी जागा नाही. तर काजूपाडा बस थांब्यावरून पाई चालत आम्ही मुंडा डोंगराकडे निघालो...

सुमारे १०-१५ मिनिटे चालल्यावर एक पेट्रोल पंप आम्हाला दिसला. त्याच्याच समोर एक गोलाकार दगड रस्त्याच्या अगदी कडेला आहे. त्या गोलाकार दगडाच्या बाजूलाच ३० की. मी. हा गोल फलक आहे. तो फलक म्हणजे एक खूण आहे, की आता डोंगरावर चढणे सुरू करायचे. एक छोटा खंदक ओलांडला, की वर जाण्यासाठी एक पाऊलवाट दिसते. त्या पाऊलवाटेने आम्ही सगळे वरच्या दिशेने चढू लागलो. ज्यांना पायांचा किंवा गुडघ्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ते चढण थोडं कठीण असू शकेल. पण तसं पाहिलं तर ते फारसं कठीण नाही. निसरडी माती आणि हलणारे दगड, यांच्यावर सांभाळून चाललं तर चढण सोपी आहे. जसजसे आम्ही वर जात होतो, तसतसे घोडबंदर रोडवरच्या गाड्यांचे आणि हॉर्नचे आवाज कमी होत होते. चढताना दमछाक होत नव्हती. पण घामाच्या धारा मात्र लागल्या होत्या...

डोंगर जसा वर जात होता, तसे विविध पक्षांचे आवाज आम्हाला ऐकू येत होते. Indian Golden Oriole, Yellow-foolted Green Pigeon, असे अनेक पक्षी तिथे आहेत. शिवाय खंड्या (Kingfisher), भरद्वाज (Greater Coucal), घारी आणि दोन वेगळ्या प्रकारचे पोपटही तिथे आढळतात. या सर्व पक्षांचे आवाज अनुभवत असताना आम्हाला आमच्या अगदी जवळ, स्पष्ट ऐकू आली, ती मोराची केका. आवाजाच्या दिशेने आम्ही पाहिलं खरं. पण मोर काही दर्शनास पडला नाही. बाकी पक्षांमधले काही मात्र इकडून तिकडे उडताना आम्हाला दिसत होते. बहुतेक त्या पक्षांना माणसांपेक्षा, झाडं, पानं, फुलं, जास्त भावत होती. त्यामुळे त्यांच्या आडून ते पक्षी आम्हाला साद घालत असावेत. झाडांवरचे आणि आकाशतले पक्षी तर होतेच. पण त्यांच्या सोबतच होते विविध-रंगी कीटक...




डोंगर माथ्यावर जातानाच्या वाटेवर अनेक छोटे-मोठे कीटक आम्हाला दिसत होते. त्यातही Red Velvet Mite, Camouflage Spider, Indian Red Scorpion, Cotton Bug, हे जास्त प्रमाणात होते. शिवाय जागो-जागी काळ्या आणि लाल मुंग्याची आणि मोठ्या काळ्या डोंगळ्यांची पूर्ण वसाहत तिथे होती. एका ठिकाणी वाळवीने तयार केले फंगस होते, तर दुसरीकडे फुलपाखरांनी टाकलेल्या काती होत्या. सगळं काही न्याहाळत, मजल-दरमजल करत, सुमारे ४५-५० मिनिटं वर चालून आम्ही डोंगराच्या वर असलेल्या पठारावर पोहोचलो. मोकळी हवा, चारही बाजूला झाडी, दूरवर दिसणारं विहंगम दृश्य, एका बाजूला धावत्या शहराचा नजारा तर दुसऱ्या बाजूला शांत असा तलाव. सभोवतालचं ते सुंदर दृश्य डोळ्यांवाटे मनात आणि कॅमेऱ्यात साठवत आम्ही पठारावर थोडा वेळ घालवला...





साधारण १५-२० मिनिटं तिथल्या मनोरम दृश्याचा मनसोक्त आनंद घेतल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. चढताना जे अंतर आम्ही ४५-५० मिनिटात कापलं होतं, उतरताना तेच अंतर कापायला आम्हाला फक्त २० मिनिटंच लागली. आम्ही पुन्हा घोडबंदर रोडला लागलो आणि आकाशने तिथेच आमचा निरोप घेतला. मुंडा डोंगर चढ-उतार करून आलेला क्षीण नंतर केलेल्या नाश्त्याने उतरून गेला. घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या शहरी जीवनातून दोन तास सुट्टी घेऊन, तो वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवल्याचा आनंद काही औरच होता...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Comments

Popular posts from this blog

पारंपारिक हिरवळ...

नयनरम्य संगमेश्वर-कोयना...