नयनरम्य संगमेश्वर-कोयना...

दर वर्षी दिवाळीत किंवा डिसेम्बरमध्ये आम्ही पारिवारिक सहलीला जातो. कोकणातला काही भाग पायांखालून घालावा आणि तिथला निसर्ग नजरेत साठवावा यासाठी, यंदा संगमेश्वर आणि कोयना या जागा निवडल्या...

या सहलीची मुख्य गम्मत म्हणजे आमच्यासह अजून एक परिवार यात सामिल झाला होता. सहलीला जाण्यापेक्षा ठरवा-ठरवीतच जास्त मजा येते. पार अगदी हिमाचल प्रदेशमधून खाली उतरत, मध्यप्रदेश आणि राजस्थानमार्गे आमच्या गप्पांची गाडी महाराष्ट्रात येऊन पोहोचली. जर महाराष्ट्रच, तर कोंकण का नको... या विचारावर सगळ्यांचं एकमत झालं आणि संगमेश्वर या ठिकाणावर शिक्कामोर्तब झालं...

तसं संगमेश्वरला बाय रोड देखील जाऊ शकतो. जवळपास साडे सहा तास लागतात. पण कोकणात जायचं आणि ट्रेनची मजा नाही असं कसं होईल... जन शताब्दीच्या "विस्टाडोम" या डब्याचा विचार मनात घोळत होता. विस्टाडोम हा एकच डबा असतो ज्यात फक्त ३६ सीट्स असतात. त्यामुळे बुकिंग सुरू झाल्या झाल्या फुल होऊन जातं. मला फक्त पंधरा मिनिटं उशीर झाला आणि विस्टाडोमचं बुकिंग फुल झालं. वेटिंग लिस्ट १४ पर्यंत गेली...

इथे मुद्दा असा, की शंभर सीटमधून १४ पास होणं सोपं आहे. पण ३६ मधून १४ पास होणं बऱ्यापैकी कठिण. म्हणून थोड्या जड अंत:करणाने विस्टाडोमचा विचार सोडून देऊन त्याच जन शताब्दीमध्ये ए.सी. चेयर कार बुक केल्या. ट्रेनचं बुकिंग झालं. तिथे फिरण्यासाठी गाडी मुकर्रर झाली. राहण्याचं हॉटेलही बुक झालं. आता वाट पहायची होती, ती आमच्या सहलीला सुरुवात होण्याची...

दि. ०२.११.२०२४...

सहलीला सुरूवात झाली ब्राह्ममुहूर्तावर. अर्थात रात्रीच्या तीन वाजता. दादर सेन्ट्रलहून जनशताब्दी ट्रेन सकाळी ५:२५ला सुटणार होती. त्यामुळे चार वाजता घर सोडणं क्रमप्राप्त होतं. सगळे ठरवल्याप्रमाणे चार वाजता भेटले आणि  ४:४५ला दादर स्थानकात आमची वरात पोहोचली. गाडीला अजून अर्धा तास होता. प्लॅटफॉर्मवर पोहोचून आमचा डबा कुठे येईल हे पाहून आम्ही ट्रेनची वाट पाहू लागलो. ठरल्या वेळेला ट्रेन आली आणि सुटलीदेखील. गप्पा आणि धुक्यातून मागे जाणारा निसर्ग यांच्या सोबतीने मजल-दरमजल करत साधारण दहाच्या सुमारास चिपळून स्टेशन आलं देखील...



स्टेशनबाहेर आमची गाडी तयारच होती. साधारण तासाभरात आम्ही "मामाचं घर" म्हणजेच "रस्टिक हॉलिडेज" या आमच्या निवासस्थानी पोहेचलो. निसर्गाच्या सानिध्यात सुमारे सहा एकर परिसरात हे हॉटेल आहे. इथे असलेल्या सर्व कॉटेजेसना वेगवेगळ्या पक्षांची नावं दिली गेली आहेत. आमच्या कॉटेजचं नाव
'किंगफिशर' होतं. शेणाने सारवलेल्या जमिनी, छतावर कौलं आणि आत असणारा नैसर्गिक थंडावा. या सर्व गोष्टींमुळे एकदम 'out of the world' असं वाटत होतं. थोड्याच वेळात जेवणाची सोय केली गेली. पोळी-भाजी, कुरडया, तळलेल्या मिरच्या, शेतातल्या काकडीची कोशिंबीर आणि शेतातल्याच तांदुळाचा भात. अशा या सुग्रास जेवणावर आम्ही ताव मारला...




थोडा आराम करून
, संध्याकाळी चार वाजता, जवळच म्हणजे, १५-१६ कि.मी.वर असलेल्या करजुवे या गावीनदीजवळ आम्ही आलो. सुंदर परिसर होता. नुकता सुर्यास्त होत चालला होता. पाण्याच्या पात्रात दिसणारं सूर्यबिंब आणि आकाशात दिसणारा सूर्य नारायण असं विहंगम दृश्य समोर होतं. फोटो काढता काढता वेळेला पंख फुटले आणि अंधार पडल्याने बोटिंग राहूनच गेलं. हॉटेलवर परत आलो तर श्रीनिवास पानसे यांचा प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम आमची वाट पाहत होता. आधी वाटलं, आलोच आहोत तर थोडा वेळ हजेरी लाऊ आणि सटकू जेवायला. पण व्याख्यानाचा विषयच इतका सुंदर होता, की कोणाचाच पाय निघेना. पेंडसे सरांनी, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि महाराज्ञी तारा राणी यांनी गाजवलेल्या काही मोहिमांचा इतिहास आमच्या समोर उलगडला. व्याख्यान झालं आणि रुचकर शेवट व्हावा असं गरमा गरम थालिपीठ आणि फडफडीत मसाले भाताचा ताट समोर आलं. अशा प्रकारे झकास शेवट झाला दिवसाचा...

दि. ०३.११.२०२४...


सकाळी सवा सहा वाजता जाग आली. आवरून-सवरून खोलीबाहेर आलो तर पांढरं-शुभ्र धुकं पसरलं होतं. या धुक्यातून प्रभात फेरी मारू लागलो. वातावरण एकदम थंडगार होतं. शिवाय झाडांवरून पडणारे दवबिंदू त्यात अधिक भर घालत होते. वाटेत नितीन भाऊ आणि शिल्पा ताई भेटल्या. त्यांच्यासोबत गप्पा सुरू असताना झाडांच्या बाजूने वेगवेगळ्या शिट्ट्या आणि वेगवेगळे आवाज येत होते. शिल्पा ताई म्हणाल्या रॉबिन
, मलाबार व्हिसलिंग बोगी आणि सनबर्ड सह इथे जवळ जवळ दिड-दोनशे पक्षी वास्तव्य करून आहेत. पक्ष्यांच्या आवाजांचे जे रिंगटोन आपण ऐकतो, ते आवाज असे प्रत्यक्षात ऐकण्याची मजा काही औरच होती...


आज बाहेर फिरायला जाण्यासोबत एक खास आकर्षण होतं
'रस्टिक होम स्टे'ची सफर. ही सफर दोन भागात होती. पहिला भाग होता आवारातली सफर आणि संध्याकाळी करकरे दामपत्याच्या घराची पाहणी. चहा-नाश्ता झाल्यावर 'रस्टिक होम स्टे'चे मालक नितीन करकरे यांनी आम्हाला परसबागेची सफर घडवली. हॉटेलच्या आवारात लावलेली वेगवेगळी झाडं, वनस्पती, फुलं, पानं यांच्या दर्शनासोबत नितीन भाऊ आम्हाला त्या-त्या वेलींची आणि वृक्षांची माहितीही पुरवत होते. एक मजेशीर गोष्ट आम्हाला सापडली. ती म्हणजे लायकन अर्थात झाडांच्या खोडांवर येणारा पांढरा फंगस. हा फंगस म्हणे तेव्हाच येतो जेव्हा वातावरणात शून्य प्रदुषण असतं. परसबागेची सफर झाली आणि आमची दिंडी हॉटेलच्या मुख्य द्वारापाशी आली. बाहेर आमची गाडी तयारच होती. पुढे होतं मुक्काम पोस्ट उकशी...


'
रस्टिक होम स्टे'हून रत्नागिरीकडे जाताना वाटेत डिणी नाका लागतो. तिथून उजवीकडे वळल्यावर वरच्या अंगाच्या दिशेने उकशी हे गाव आहे. संपूर्ण अंतर साधारणपणे ३५ ते ४० किं.मी. आहे. पण घाटाचा वळणदार रस्ता असल्याने जवळपास तासभर लागला आम्हाला तिथे पोहेचायला. मुख्य रस्त्यापासून १६ कि.मी. आत प्रकाश हॉटेल आहे. तिथे सुधीर (भाई) रिसबूड आणि रुतविज आपटे आमची वाट पाहत होते. हे दोघंही पर्यटकांना तिथे असलेल्या 'Petrogliphs' अर्थात कातळशिल्पांचं दर्शन घडवतात. 'Petro' म्हणजे काळा खडक आणि 'Gliph' म्हणजे कोरणे. सुमारे दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी या भागात जे कोणी राहत होते, त्यांनी डोंगराच्या दिशेने आलेल्या या खडकांवर सुंदर कोरीव काम करून ठेवलं होतं. यांना दूसरा शब्द ‘Geogliph’ असाही आहे...

मुख्यत्वे प्राण्यांची, जलचरांची चित्र कोरलेली होती. काही चित्रांमध्ये नुसत्याच रेघोट्या आणि काही आकार होते. पण त्यातही त्या चित्रतारांमध्ये असलेली कला दिसून येत होती. पण यात दोन सर्वात विलक्षण गोष्टी होत्या. पहिली म्हणजे या चित्रांचे आकार, खऱ्या आकृतीच्या ऊंची आणि रुंदी इतके किंवा त्याहूनही जास्त लांबी-रुंदीचे होते. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रात बारकावे अचूक दाखवले गेले होते. या चित्रांचा इतिहास आणि चित्रकाराची चित्र काढण्यामागची मानसिकता यावर रिसबूड आणि आपटे यांचं संशोधन सुरू आहे. त्या दोघांनी इतकी सुंदर माहिती आम्हाला पुरवली की रणरणत्या उन्हाचा तडाखाही आम्ही विसरलो. तिथे असलेल्या चार कातळशिल्पांपैकी दोन शिल्प पाहून आम्ही करणेश्वर मंदिराकडे निघालो...

संगमेश्वरपासून दोन कि.मी. अंतरावर हायवेपासून थोडं आत कसबा नावाचं गाव आहे. इथेच आहे कर्णेश्वर महादेवाचं प्राचीन हेमाडपंथी मंदीर. देवीच्या आदेशानुसार पांडवांनी अज्ञातवासात असताना या मंदिराची निर्मिती एका रात्रीत केली. गाभाऱ्यात असलेल्या पाच गोलाकार आकृत्या म्हणजे पांडवांच्या जेवणाची पाच ताटं आणि गाभाऱ्यात पिंडीखाली असलेली आकृती म्हणजे पांडवांचा सहावा भाऊ सूर्यपुत्र कर्ण याचं ताट आहे अशी आख्यायिका तिथे प्रचलित आहे. मंदिराच्या आवारातच अनिरुद्ध बापट यांचं निवासस्थान आहे. तिथे एक documentary evidence पहायला मिळतो ज्यानुसार हे मंदिर साधारण १६०० वर्ष जुनं आहे. चाणुक्य कुळातील राजा कर्णाने या मंदीराची निर्मिती केली म्हणून या मंदिराला कर्णेश्वर हे नाव मिळालं...




हे मंदिर शिल्पकलेचा एक उत्तम नमूना म्हणून नावाजलं जातं. मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर शिवपंचायत कोरलं आहे. डाव्या आणि उजव्या बाजूला अनुक्रमे नरकासूर आणि किर्तीसुर कोरलेले दिसतात. गाभाऱ्याच्या आधी चार एकसमान खांब आहेत. त्यावर देव
, दानव, नृत्यांगना, किन्नर अशी चित्र कोरलेली आढळतात. मंदिराच्या छतावर आणि बाहेरच्या बाजूलाही अप्रतीम कोरीव काम केलेलं दिसतं. या मंदिरामुळे कसबा गावाला पौराणिक आणि कलात्मक महत्व तर प्राप्त होतंच. पण या गावाला ऐतिहासिक महत्व देखील आहे. याच कसबा गावी छत्रपती संभाजी महाराज आपल्याच लोकांच्या फितुरीमुळे औरंगजेबाच्या सैन्याकरवी कैद झाले. गावाच्या वेशीवरच शंभू राजांची समाधी आहे. गावातून बाहेर पडल्यावर जवळच आरवली नावाच्या गावात असलेल्या गरम पाण्याच्या कुंडांनाही भेट देता येते. आमच्याकडे वेळेचा आभाव असल्याने त्या कुंडांचं दर्शन आम्हाला घेता आलं नाही...


आम्ही रस्टिकवर परतलो तेव्हा संध्याकाळचे साडे सहा वाजले होते. रिसेप्शनवर नितीन आणि शिल्पा करकरे बसलेच होते. आम्ही आलो तसं त्यांनी आम्हाला सात वाजता त्यांच्याच घरात असलेल्या राधा-कृष्णाच्या मंदिरात यायला सांगितलं. आम्ही तिथे पोहोचलो तर गाभाऱ्यात सतरंज्या हंतरल्या होत्या आणि नितीन भाऊ व शिल्पा ताई त्यावर आधीच आसनस्थ झाले होते. आम्ही त्या सतरंज्यांवर स्थानापन्न झालो आणि करकरे दामपत्याने सुरुवात केली. "शुभं करोति..."
, "राम रक्षा...", "कैलास राणा...", "मारुती स्तोत्र...", "मनाचे श्लोक..." असं एकामागून एक येत गेलं. आम्ही लहान असताना आमचं खेळून झाल्यावर आजी किंवा मामा आम्हा सर्व लहानग्यांना समोर बसवत आणि हे सगळं म्हणत. त्या प्रसंगांची आठवण झाली. सुमारे अर्ध्या तासाने आम्ही उठलो. नितीन भाऊ काही कामानिमित्त निघून गेले आणि शिल्पा ताईंनी आम्हाला त्यांच्या घराची सफर घडवली...


"खेड्यामधले घर कौलारू..." असं ते जुनाट पद्धतीचं पारंपारिक घर होतं. ओसरी, पडवी, माजधर, देवघर, बाळंतिणीची खोली, स्वयंपाकघर, घरात असलेले काही चोर कप्पे, काही चोर दरवाजे, फडताळे, मध्येच माडीवर जायचा रस्ता, धान्याचे कोठार, देवघराच्या बाजूला असलेलं भुयार, वापरात असलेली भांडी-कुंडी, सगळं कसं ठेवणातलं होतं. घराचे खांब सागवानी आणि शिसमच्या लाकडांचे होते. जमिनी शेणाने सारवल्या होत्या. स्वयंपाकघरातल्या जमिनी मात्र जुन्या काळातल्या फरशांनी सुशोभित केल्या होत्या. ही छोटीशी सफर पूर्ण दिवसभराचा क्षीण घालवायला पुरेशी होती. याच गोष्टीसह एका भरगच्च आणि रस्टिक मधल्या आमच्या शेवटच्या दिवसाची सांगता झाली. पुढचा दिवस होता कोयनेला प्रयाणाचा...

दि. ०४.११.२०२४...

चहा-नाश्ता झाला आणि सात्विक व पारंपारिक आठवणींसह आम्ही रस्टिक सोडलं. हायवेला लागून आम्ही गुहागरच्या दिशेने निघालो. इथे एक छोटीशी मेख आहे. म्हणजे आम्हाला जायचं होतं कोयनेला पण निघालो आम्ही गुहागरच्या दिशेने. म्हणजेच कोयनेपासून विरुद्ध दिशेला. याचं कारण असं होतं, की गुहागरला आहे श्री क्षेत्र व्याडेश्वर. आमचं कुलदेवत...


आमच्या कुलदैवताच्या इतक्या जवळ आम्ही आलो आणि दर्शन नाही घ्यायचं असं कसं होईल... तर व्याडेश्वर
, गुहागर. आम्ही दहाच्या सुमारास देवस्थानाच्या परिसरात पोहोचलो. तिथे आल्यासोबतच छान पवित्र वाटत होतं. आत एका नव-दामपत्याची पूजा, होम-हवन सुरू होतं. दर्शन घेऊन झाल्यावर ते मंत्रपठण ऐकत आम्ही थोडावेळ गाभाऱ्यातच बसलो. देवळात प्रवेश करताना उत्तेजक कपडे घालण्यात मज्जाव आहे. स्त्री आणि पुरूष दोघांनाही. हे सांगण्याचं कारण असं, की तिथे देवस्थानाच्या परिसरात हा नियम कटाक्षाने पाळला जातो. नियम न पाळल्यास प्रवेश नाकारला जातो किंवा व्यवस्थित कपडे घालूनच यावे हे सांगितलं जातं. व्याडेश्वराचं दर्शन घेऊन, मुलीच्या नावाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक सांगून आम्ही तिथून बाहेर पडलो. तिथून जवळच दुर्गा देवीचं मंदीर आहे. तिथल्या लोकांची ग्रामदेवता म्हणून हे मंदीर ओळखलं जातं...





दुर्गादेवीच्या दर्शनाला आम्ही पोहोचलो तेव्हा तिथेही मंत्रोच्चार सुरू होते. ते पवित्र शब्द कानावाटे मनात साठवून आम्ही बाहेर पडलो. समोरच लाल रंगाचं एक छोटंसं देऊळ होतं. ते सूर्यनारायणाचं मंदीर होतं. सात घोड्यांच्या रथावर स्वार असलेली सूर्यनारायणाची पितळ्याची सुंदर मूर्ती आत विराजमान होती. देवदर्शन झालं आणि गुहागरचा अथांग समुद्र आम्हाला खुणावू लागला. व्याडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला एक वाट होती. ती वाट थेट समुद्राच्या दिशेने जात होती. थंडगार वाळूवर चालत
, समुद्राची गाज ऐकत, तिथलं विहंगम दृश्य न्याहाळत आम्ही माघारी फिरलो. गाडी आता वळली थेट कोयनेच्या दिशेने, जिथे 'Forest Escapes' हे हॉटेल आमची वाट पाहत होतं...



चिपळूण-कराड रस्त्यावर गुस्तावाडीचा घाट उतरून लगेचंच समोर येतं 'Forest Escapes' हे हॉटेल. गर्द झाडीत दडलेल्या डोंगराच्या पहिल्याच टेकडीवर हे हॉटेल दिमाखात उभं आहे. टेकडीच्या पायथ्याशी 'Riverside Inn' हे हॉटेल आणि रेस्टॉरंट आहे. खान-पान सेवा जेमतेमच आहे. म्हणजे, कधी कोणता पदार्थ संपेल याचा नेम नाही. पण 'Forest Escapes'साठीचा landmark म्हणून योग्य आहे. याच 'Riverside Inn'च्या बाजूला एक लाल मातीचा खडकाळ रस्ता वरच्या बाजूला जातो. तो रस्ता जसा वळेल तसं वर जात, दहाव्या मिनिटावर येतं 'Forest Escapes.' हॉटेलच्या गेटपासून संपूर्ण परिसरात जमिनीला लाल चिऱ्याचं फ्लोरिंग दिसतं. सहसा रिसेप्शन आधी असतं मग रूम्स असतात. या हॉटेलमध्ये मात्र रिसेप्शनला रूम्सने गराडा घातलेला आहे...


इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिला आणि स्यूट आहेत. उदाहरणार्थ पूल व्हिला. हा एक स्वतंत्र बंगला आहे ज्यात दोन सेल्फ कन्टेन्ड बेडरूम, एक हॉल, एक किचन आणि बंगल्याच्या मागे असलेला स्विमिंग पूल आहे. आमच्या व्हिलाचं नाव होतं मगनोलिया स्यूट्स. यात दोन मजल्याच्या दोन इमारती होत्या. प्रत्येक मजल्यावर One BHK type दोन घरं. या दोन्ही इमारतींच्या मधोमध होता एक छोटेखानी स्विमिंग पूल. आम्ही रूमवर पोहोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. थोडा आराम करून यथेच्छ आस्वाद घेतला स्विमिंग पूलचा. संध्याकाळी पाच ते सहा तिथली फार्म व्हिजिट अनुभवली. इंद्रायणी तांदुळाची शेती पाहिली. महाराष्ट्रात कोयना या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. त्या पाण्याचा यथायोग्य उपयोग करण्यासाठी स्टेप फार्मिंग आणि ड्रिप इरिगेशन या पद्धतींचा इथे पुरेपूर वापर दिसला...





फार्म व्हिजिट झाली आणि रिसेप्शनच्यावरच्या मजल्यावर कोयना धरण व त्याचा इतिहास दाखवणारी पन्नास मिनिटांची एक छोटी documentary दाखवली गेली. अमराठी पाहुण्यांसाठी १२ मिनिटांची इंग्रजी documentary आणि त्यानंतर ३७ मिनिटांची मराठी documentary दाखवली जाते. तो एक तास संपल्यावर तिथेच karoakeची सोय देखील केलेली असते. हौशी गायकांसाठी ती एक छानशी संधी असते. एकीकडे karaoke सुरू असताना खालच्या मजल्यावर जेवणाची सोय केली जाते. इथे बुफे लंच किंवा डिनर नाही. ज्यांनी लंच किंवा डिनर त्यांच्या पॅकेजमध्ये घेतलेलं असतं ठराविक दोन-तीन भाज्या, ठराविक चायनीज पदार्थ आणि ठराविक रोटी किंवा नान किंवा पराठे वाढले जातात. बाकी सर्वांना मेन्यू कार्डाप्रमाणे ठरवता येतं. किमती काही अवाजवी नाहीत. माणशी रु. ५००/- पर्यंत खर्च होतो. अर्थात आम्ही शाकाहारी असल्याने आम्हाला तसा खर्च आला. मांसाहारी आहार असणाऱ्यांना कदाचित थोडा जास्त खर्च होईल...

माहिती म्हणून सांगतो. तळीरामी व्यक्तिमत्वाच्या सोमरस शौकिनांसाठी रिसेप्शनच्या खालच्या मजल्यावर तशी सोय केलेली आहे. अर्थात मनुष्याव्यतिरिक्त तिथली कुठलीही गोष्ट तिथून बाहेर येणार नाही या अटीवरच आत प्रवेश दिला जातो. तर आमची जेवणं झाली. हॉटेलमध्येच एक छोटी फेरी मारून आम्ही रूमवर परतलो. गप्पा आणि पत्ते यांचा मनमुराद आनंद घेत दिवस सरला...

दि. ०५.११.२०२४

सकाळी ६ वाजता जाग आली. बाल्कनीत आलो तर अंधार होता. हलकी हलकी थंडीही पडली होती. सकाळची शांतता भंग करत होते वेगवेगळ्या पक्षांचे आवाज. त्या नेहमीच्या आवाजात सामिल होता एक वेगळा आवाज. तो होता मोराचा. काही काही क्षणांत मोराचा आवाज येत होता. पण मोर मात्र दिसत नव्हते. तिथल्या काम करणाऱ्यांना विचारलं तर ते म्हणाले पलिकडच्या जंगलात मोर आहेत पण वाढलेल्या झाडीमुळे ते सहसा येत नाहीत. आलेच तर झलक दाखवून परततात. ते सगळे आवाज ऐकता ऐकता जवळ जवळ तासभर गेला आणि आमच्या नेचर वॉकची वेळ जवळ आली...

बरोब्बर सात वाजता हॉटेलच्या मेन गेट जवळ आम्ही सारे जमलो. तिथे हॉटेलचाच एक माणून गाईड म्हणून आमच्या सोबत आला. ज्या खडकाळ रस्त्याने आम्ही हॉटेलपर्यंत आलो होतो त्याच रस्त्याने पण हॉटेलपासून विरुद्ध दिशेला वरच्या बाजूने आम्ही चालू लागलो. वाटेत तो गाईड आम्हाला वेगवेगळे पक्षी, किडे, झाडं, वनस्पती दाखवत होता आणि त्यांच्याबद्दल माहितीसुद्धा देत होता. त्याही वेळी मोरांचा आवाज येत होता. पण मोर आमच्याशी लपाछुपीच खेळत होते. एका ठिकाणी गाईडने आम्हाला थांबवलं आणि आवाज न करता डावीकडे पहायला सांगितलं. आम्ही तिथे पाहिलं तर एक हरिण आमच्याकडेच पाहत उभं होतं. आमच्यातल्या एकाने कॅमेरा काढला. त्याच्या खट् अशा आवाजाने हरिण सावध झालं आणि झाडीत पळालं...

हा जो नेचर वॉक आहे, तो हॉटेलच देतं. त्यामुळे तो मोफत असतो. नेचर वॉकसह फार्म व्हिजिट, Koyna documentary आणि karaoke हॉटेल स्वत: देत असल्याने ते सर्व मोफत आहे. सकाळ आणि संध्याकाळचे Bird Watching आणि Jungle Safari हॉटेलबाहेरची एक संस्था करते त्यामुळे त्यासाठी हॉटेलमध्येच रिसेप्शनसमोरच असलेल्या ट्रॅव्हल डेस्कवर आगाऊ पैसे भरून बुकिंग करावं लागतं. तर तासाभराचा तो वॉक घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो. कर्मचाऱ्यांपैकी एकाने नाश्ता तयार असल्याची वर्दी दिली. रात्री आम्ही जिथे जेवलो होतो तिथेच डायनिंग रूममध्ये बुफे ब्रेकफास्टची सोय केली गेली होती. ब्रेड, चहा, कॉफी या नेहमीच्या जिन्नसांसह बाकी जिन्नस आलटून-पालटून ठेवले जातात...



चवदार नाश्ट्याचा आनंद घेत असताना कुठे कुठे जायचं याबद्दल चर्चा सुरू होती. ऐतिहासिक कोयना धरण डोळ्यांखालून घालावं हा विचार तर होताच. तिथल्या एका वेटरला याबद्दल विचारलं असता तो म्हणाला
, की धरणावर जायला पास काढावा लागतो. त्यासाठी कागदपत्र आणि पैसेही द्यावे लागतात. त्याचबरोबर त्या वेटरने "Wind Chalet Resort" बद्दल सांगितलं. नेहरू गार्डनजवळ असलेल्या हमबर्ली रस्त्यावर सुमारे दहा कि.मी.वर हे हॉटेल वसलेेलं आहे. Wind Chalet हा Forest Escapesचाच एक भाग आहे. पण हे हॉटेल Forest Escapesच्या आधी सुरू झालं होतं. आम्ही Wind Chaletला पोहोचण्याच्या आधीच आमच्या येण्याची खबर तिथे पोहोचली होती. तिथल्या वेटरने आम्हाला एक कॉटेज उघडून दिलं. कॉटेजच्या बाल्कनीतून आम्ही खाली पाहिलं तर कोयना धरणाचं मनोरम दृश्य समोर होतं. जणू काही धरणाचा ariel view आम्ही पाहत होतो. भरपूर फोटो काढून वेटरला धन्यवाद देऊन आम्ही नेहरू गार्डनच्या दिशेने निघालो...






नेहरू गार्डनच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये आम्हाला एक माणूस दिसला. हा माणूस सरकारी गाईड होता आणि ज्यांना धरणाजवळ जायचं नसेल पण धरण आणि इतिहासाबद्दल माहिती हवी असेल
, त्यांना हे गाईड, माणशी दोनशे रुपयांमध्ये back waters, कोयना धरणाचा परिसर, ओझरडे धबधबा आणि चौथ्या प्रकल्पाची जागा दाखवतात. आमच्यासोबत दोन लहान मुलं असल्याने तो गाईड रु. १०००/- मध्ये कबूल झाला. चौथ्या प्रकल्पाकडे जाताना वाटेत तीन बोगदे लागतात. प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करण्यासाठी हे बोगदे त्या काळी तयार केले गेले होते. आम्ही वर पोहोचलो. आमच्या उजव्या हाताला होतं जंगली जयगढ किल्ल्याचं शिखर आणि डाव्या हाताला होता हिरवागार सहयाद्री. एका ठिकाणी आम्हाला काही पदचिन्ह (pugmarks) दिसली. त्या गाईडच्या सांगण्यानुसार ही पदचिन्हं जंगली गवे, साळिंदर आणि बिबट्याची होती. हे ऐकून पोटात गोळा आला खरा. पण हे प्राणी संध्याकाळी अंधार पडल्यावर येतात हे कळल्यावर जरा हायसं वाटलं...






ही जंगली श्वापदं आस-पास असताना या प्रकल्पावर काम करणारे कर्मचारी इथे कसे राहत असतील हा विचार करत आम्ही खाली आलो. नदीच्या पात्राच्या अगदी जवळ आम्ही पोहोचलो. तिथे धरण दिसत नाही. पण पाण्याखाली भुयारी मार्ग करण्यासाठी जिथे स्फोट घडवले गेले ती जागा नक्कीच निदर्शनात येते. तिथे थोडा वेळ घालवून आम्ही माघारी फिरलो. वाटेत ओझरडे धबधबा लागला. तिथले निसर्गरम्य फोटो काढून आम्ही नेहरू गार्डनपर्यंत पोहोचलो. वाटेत त्या गगाईडने सांगितलेले किस्से आणि घटनांमुळे आमचं छान मनोरजन झालं. नेहरू गार्डनला पोहचेपर्यंत एकचा सुमार झाला होता. वाढतं ऊन आणि वाढती भूक यांमुळे नेहरू गार्डनला चाट देऊन आम्ही जेवणासाठी हॉटेलला आलो. ट्रिपची शेवटची संध्याकाळ आम्ही हॉटेलवरच घालवली. तिथले खेळ म्हणजे
Badminton, Archery, Chess, Table Tennis, Swimming आणि जेवण यांचा मनाजोगता आनंद घेऊन दिवसाचा गोड शेवट केला...

दि. ०६.११.२४ हा आमच्या परतीच्या प्रवासाचा दिवस असल्यामुळे आजचा हा दिवस आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस होता. एक आठवणीत राहणारी आणि फोटोजच्या रूपाने साठवणीत राहणारी संगमेश्वर-कोयनेची ही सफर खरंच नयनरम्य होती...

काही घटना आणि प्रसंग...




संगमेश्वर आणि कोयना निसर्गाच्या सानिध्यात आणि सह्याद्रीच्या गराड्यात असल्याने इथे फोटोग्राफीला तुटवडा नव्हता. शिवाय संगमेश्वरचं तुरळ हे खेडं असल्याने रस्टिक होम स्टे मध्ये देखील काही वेगळे फोटो काढायला मिळाले. काही निवडक फोटो आणि आमच्या ट्रिप दर्म्यान घडलेले काही प्रसंग आणि घटना आता तुमच्यासोबत शेयर करतो आहे...

धावती भेट...

दि. ०२.११.२४ ला करजुवे back watersवरून आम्ही रस्टिककडे निघालो तेव्हा साधारण पावणे सहा झाले होते. तो प्रवास आम्ही तिथल्या स्थानिक रिक्षांमधून केला होता. रिक्षावाले काका आम्हाला तिथल्या ग्रामदेवते बद्दल, रहिवाशांबद्दल, गावाबद्दल माहिती देत होते. गाव-खेड्यांमधून अंधार लवकर पडतो. पावणे सहा ही अंधाराची वेळ नसली तरी तिथे मात्र सात वाजल्यासारखं वाटत होतं. बोलता बोलता काका एकदम गप्प झाले. त्यांनी रिक्षा एकदम धीमी केली. कुजबुजत त्यांनी कॅमेरा चालू करून फ्लॅश पाडून रिक्षाच्या डाव्याबैजूला त्लिक करायला सांगितलं. मी तसं केलं आणि फ्लॅशच्या प्रकाशात जे दिसलं,  त्यामुळे थरकाप उडाला. रस्त्यालगतच्या झाडी एक बिबट्याचं पिल्लू आमच्याकडेच रोखून पाहत बसलं होतं. फ्लॅशमुळे ते लगेच झाडीत पळालं. पिल्लू असलं म्हणून काय झालं, बिबट्याच तो... झाडीच्या ऐवजी त्याने रस्त्याकडे मोर्चा वळवला असता तर...


लपवा-छपवी...


नितीन भाऊ आणि शिल्पा ताईंचं घर एकदम पारंपारिक आहे. त्यामुळे तिथे चोर दरवाजे
, चोर वाटा तर आहेतच. पण याशिवाय तिथे अजून एक गोष्ट आम्हाला पहायला मिळाली. दि. ०३.११.२४ला आम्ही करकरे दामपत्याचं घर पाहत असताना शिल्पा ताईंनी आमच्या रूमची चावी मागून घेतली. त्या म्हणाल्या, की त्या आमची चावी स्वयंपाकघरातच लपवतील पण कुठल्याही भांड्यात नाही. दुसऱ्याच क्षणी चावी लपवून त्या बाहेर आल्या. सारं स्वयंपाकघर शोधून थकल्यावर नितीन भाऊंनी आमचं लक्ष जमिनीपासून तीनेक फुटांवर असलेल्या एका भोकाकडे नेलं. त्या भोकाच्या खाली ठोकलं असता पोकळीसारखा आवाज आला. नितीनभाऊ म्हणाले बायकांचा वावर जिछे जास्त असतो तिथे अशा खोबण्या असतात. आपल्या मौल्यवान चीज-वस्तू त्या भोकातून आत सरकवायच्या. भिंतीत असलेल्या भांड्यात त्या जाऊन पडतत. भिंत फोडून भांडं काढून वस्तू परत मिळवायच्या आणि भिंत पूर्ववत करायची. गावात चोरांचा सुळसुळाट असल्याने या गोष्टीचा सेफ म्हणून वापर करता येतो...

शॉर्टकट...


मुख्य रस्त्याने फॉरेस्ट पर्यंत गाडीने पोहोचायला दहा मिनिटं लागतात. तेच अंतर जर पायी चालत गेलो तर १५ ते २० मिनिटात जाता येतं. हॉटेलच्या आत एक असा रस्ता आहे जो हॉटेलपासून सुरू थेट खाली म्हणजे रिव्हरसाईड हॉटेलच्या बाजूच्या रस्त्याला येऊन मिळतो. हा मर्ग पूर्ण जिन्याचा असून थेट खाली जाणारा असल्याने पाच ते सात मिनिटाच खाली किंवा वर पोहोचता येतं. हॉटेलच्या स्टाफकडून या मार्गाबद्दल ऐकसं होतं. म्हणून दि. ०५.११.२४च्या संध्याकाळी मी आणि माझ्या मुलीने हा मार्ग बघायचं ठरवलं. रिसेप्शनच्या आधी स्काय व्हिला हे कॉटेज येतं. त्याच स्काय व्हिलाच्या समोर एक रस्ता आहे. तिथेच रस्ता संपल्यावर हा शॉर्टकट सुरू होतो. उतरताना आम्हाला काहीच नाही जाणवलं. बरोब्बर पाचव्या मिनिटाला आम्ही खाली होतो. परत फिरलो तेव्हा मात्र थोडी दमछाक झाली कारण वळणदार पायऱ्यांचं चढण होतं. उजेड कमी होत होता. शिवाय आजू-बाजूच्या झाडीतून चित्र-विचित्र आवाज येत असल्याने, मध्ये पानांची सळसळ होत असल्याने माझी मुलगी घाबरली. मी म्हणालो आपण फोनमध्ये गाणी लाऊ. एक गाणं पूर्ण होतं तोच आम्ही स्काय व्हिलासमोर पोहोचलो तेव्हा कुठे मुलीने उसासा सोडला...



या ट्रिपमध्ये फारशी साहसं नाही झाली. अजून एक परिवार सामिल असल्याने प्रत्येकाला सोबत होती. देवदर्शनासह निसर्गाचं सुंदर रूप आणि इतिहास अशा तिहेरी संगमामुळे आमची ही संगमेश्वर-कोयना सहल एकदम झकास पार पडली...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Comments

Popular posts from this blog

पारंपारिक हिरवळ...

निसर्गाच्या सानिध्यात...