राजेशाही हिरवळ (बेंगलूरू-मैसूरू-ऊटी)...
दर वर्षी , दिवाळीत किंवा डिसेंबरमध्ये मी एक पारिवारिक सहल (फॅमिली ट्रिप) करतो. यंदा म्हणजे २०२३च्या दिवाळीत , बेंगलूरू-मैसूरू-ऊटी अशी सहल ठरवली... वर्षभर आधीच या ट्रिपची तयारी सुरू होती. वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजंसीजकडून या ट्रिपची माहिती मिळवण्यात जून २०२३ उजाडला. चार-पाच ट्रॅव्हल कंपन्यांमधून आम्ही राजगुरू टूर्सची निवड केली. दादरला असलेल्या राजगुरू टूर्सने माझ्या गरजेनुसार ट्रिपची आखणी करून दिली. ऑफ सीझन म्हणजे जून-जुलाय-ऑगस्टमध्ये सर्व बुकिंग केल्याने सर्व गोष्टींचे दर कमी होते. हॉटेल , विमानाची तिकिटं आणि तिथे फिरण्यासाठी गाडी या सर्वांसाठी ठरलेली रक्कम पूर्ण करून आम्ही ट्रिपच्या दिवसाची वाट पाहू लागलो... १३.११.२०२३... सोमवार दिनांक १३.११.२०२३ रोजी सकाळी ९:२५च्या एयर इंडियाच्या विमानाने आम्ही प्रथम मुंबई ते बेंगलूरू असा प्रवास केला. विमान प्रवासात विमानात मिळणाऱ्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांचं आगाऊ बुकिंग , त्या त्या कंपनीच्या साईटवर जाऊन , बुकिंग किंवा पी.एन.आर. नंबर देऊन करता येतं. इतकंच नाही , तर फ्लाईटमधला सीट नंबर आरक्षित ( reserve) करून वेब चेक-ईन करून ई-बोर्डिंग पासही मिळवत...